राष्ट्रपती कार्यालय

बांगलादेशातील युवा शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted On: 27 FEB 2024 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024

बांगलादेशातील युवा शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यानिमित्ताने बांगलादेशातील प्रतिभावान युवकांशी संवाद साधता आल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.

संपूर्ण बांगलादेशातून सगळ्या क्षेत्रातील युवकांचा या शिष्टमंडळात समावेश असून 50 टक्क्याहून अधिक महिलाही त्यात सहभागी असल्याचे त्या म्हणाल्या. शिष्टमंडळाची इथली उपस्थिती ही त्यांची फक्त भारतभेट नाही तर दोन देशातील ही सेतूबांधणी आहे तसेच भारत- बांगलादेश यांच्यातील सहकार्य आणि मैत्रीचे द्योतक आहे, असे त्या म्हणाल्या.  

भारत आणि बांगलादेश यांच्यात इतिहास, संस्कृती आणि बलिदानाचा अनोखा बंध आहे. बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील मित्र आणि भागीदार असल्याचा भारताला अभिमान आहे. भारत बांगलादेश सोबत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील नाते हे हृदय आणि आत्म्याचे नाते आहे. आपल्यात एक खोलवर रूजलेला सांस्कृतिक दुवा आहे, कला, संगीत, क्रिकेट आणि खाद्यपदार्थांवर आपले एकसमान प्रेम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टागोरांनी दोन्ही देशांसाठी लिहिलेली राष्ट्रगीते ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘बाउल’ संगीत आणि काझी नजरुल इस्लाम यांच्या कलाकृतींवर आपले प्रेम आहे. आपली एकता आणि विविधता आपल्या सामायिक वारशाच्या रूपात साजरी केली जाते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

भारत बांगलादेश सोबतच्या मैत्रीला भारत सर्वोच्च प्राधान्य देतो आणि त्याची पूर्ण क्षमता काय आहे हे ओळखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या.

 जगाला आकार देण्याची अमर्याद क्षमता असलेल्या उत्साही युवकांची संख्या भारत आणि बांगलादेशात  मोठ्या प्रमाणावर असून या युवकांनी आपल्या क्षमतेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

सोनार बांगला उभारणीच्या दिशेने काम करत असताना भारत आणि बांगलादेश यांच्यातील शांतता, समृद्धी आणि मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.


 


S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2009574) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi