संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्‍याच्या लष्‍करी तंत्रज्ञान संस्थेला नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी 19 फेब्रुवारी 24 ला दिली भेट


भविष्यातील युद्धांच्या उदयोन्मुख प्रतिमानांशी जुळवून घेण्यासाठी आमच्या पारंपरिक युद्धविषयक यंत्रणेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता : नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार

Posted On: 19 FEB 2024 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2024

 

नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी भविष्यातील युद्धांच्या उदयोन्मुख प्रतिमानांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या पारंपरिक युदधविषयक  यंत्रणेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याच्या  आवश्‍यकतेवर भर दिला. ते आज (19 फेब्रुवारी, 24)  पुणे येथील गिरीनगरमधील लष्‍करी तंत्रज्ञान संस्थेमध्‍ये (एमआयएलआयटी) बोलत होते. “भारतापुढील सागरी आव्हाने आणि भारतीय नौदलाचे प्रयत्न” या विषयावर बोलताना नौदल प्रमुखांनी सुरक्षा  भागीदार म्हणून भारतीय नौदलाच्या दूरदृष्टीवर भर दिला.

अॅडमिरल आर  हरी कुमार यांनी हिंद महासागर क्षेत्राचे महत्त्व, या क्षेत्रातील  सागरी आव्हानांविषयी बोलताना, अलिकडच्या काळामध्ये भारतीय  युद्धनौकांनी  चाचेगिरीच्या  विरोधामध्‍ये केलेल्‍या  मोहिमा अधोरेखित केल्या. तसेच सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्वावलंबी दृष्टीकोन आणि वर्धित सहयोगी प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. एकत्रितपणे लढा देण्‍याच्या  युगात सशस्त्र दलांना आकार देण्यासाठी आता ‘टेक्नो-वॉरियर्स’  म्हणजेच ‘तंत्रज्ञ-योद्धे’ यांची  भूमिका महत्वाची असणार आहे, यावर नौदल प्रमुखांनी  प्रकाश टाकला. तसेच भविष्यातील युद्धात विशिष्ट तंत्रज्ञान एकत्रित करण्याच्या गरजेवर भर दिला.

आधुनिक भारतीय नौदलाचा पाया रचणारे महान भारतीय योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या  मुहूर्तावर नौदल प्रमुखांनी पुण्यातील लष्‍करी तंत्रज्ञान संस्थेला  भेट दिली.

नौदल प्रमुखांनी आज  ‘एमआयएलआयटी’मध्‍ये नव्याने स्थापन केलेल्या प्रयोगशाळांनाही भेट दिली. यावेळी ‘फ्रेंडली फॉरेन काउंटीज’ मधील तीनही  सेवेतील अधिकाऱ्यांना सज्ज करण्‍यासाठी  करीत असलेल्या महत्‍वपूर्ण कामगिरीबद्दल ‘एमआयएलआयटी’चे अभिनंदन केले. यामध्‍ये  तंत्रज्ञ-योद्धा, भावी कमांडर आणि ‘स्टाफ ऑफिसर’ म्हणून अधिकाऱ्यांना  तयार करण्याच्या  भूमिकेबद्दल अभिनंदन त्यांनी केले.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2007260) Visitor Counter : 101


Read this release in: English , Urdu , Hindi