कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
18 FEB 2024 7:16PM by PIB Mumbai
नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोयी दूर होऊ शकतात, असे मत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज व्यक्त केले.
नवोन्मेष हे एकट्या शास्त्रज्ञांचे क्षेत्र नाही तर कोणतीही व्यक्ती मानसिकता आणि दृष्टिकोन बदलून नावीन्यपूर्ण उपक्रम संकल्पित करु शकते, असे ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह, आज नवी दिल्ली येथे क्षमता विकास आयोगाद्वारे संकलित केलेल्या सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषावरील प्रबंधाचे औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते.
तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये नवोन्मेष आणि संस्थात्मक नवकल्पना याद्वारे नागरिकांचे जीवन सुसह्य करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन असल्याचा पुनरुच्चार डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला.
नवोन्मेषाची कल्पना साध्या राहणीमानाच्या पलीकडे जाणारी असून वर्तनात सामाजिक बदल घडवून संपूर्ण समाजाला अनेक फायदे मिळवून देते, असे त्यांनी सांगितले.
"यापैकी अनेक नवोन्मेषी कल्पना सध्याच्या वातावरणात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांना जीवन सुकर बनवणारे अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहेत," असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.
“पुढील दशकात भारताला डिजिटल क्षेत्रात सशक्त असलेला समाज आणि ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करण्यात डिजिटल नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपट आणि चित्रफितींच्या माध्यमातून समाज माध्यमाद्वारे व्यापक प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं असल्याच्या कारणामुळे, क्षमता निर्माण आयोगाने चित्रपट आणि चित्रफितीद्वारे सार्वजनिक प्रशासनातील नवोन्मेषाचा प्रचार करावा असे निर्देश डॉ. सिंह यांनी दिले.
क्षमता निर्माण आयोगाला 25 राज्यांमधून कृषी, रेल्वे, उपजीविका, जलसंधारण यासारख्या विविध 13 क्षेत्रातील 243 नवकल्पना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी दिली. यापैकी, तीन स्तरीय कठोर निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या 15 नवोन्मेषांचा या प्रबंधात समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2006946)
Visitor Counter : 103