आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मानसिक आरोग्यासंदर्भात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अनुभवावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेचे नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांच्या हस्ते उदघाटन
Posted On:
15 FEB 2024 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत आज नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांनी मानसिक आरोग्यावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट हे सर्व राज्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच टेलीमानससाठी मार्गदर्शन संस्थांना एकत्र आणणे हे असून हे देशातील मानसिक आरोग्याच्या आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी डॉ. पॉल यांनी किरण मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाइन टेलिमानसमध्ये विलीन करण्याची घोषणा केली.टेली-मानस या राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य हेल्पलाइनसह किरण मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाइनने सप्टेंबर 2020 मध्ये स्थापन झाल्यापासून 1,27,390 पेक्षा जास्त लोकांना सेवा दिली आहे. 10 ऑक्टोबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या टेली-मानसची सेवा मागणी करणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि त्यानंतर 6,75,000 कॉल हाताळ्यात आले आहेत. संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे , सेवेची गुणवत्ता वाढवणे आणि भारतातील मानसिक आरोग्य सहाय्याची वाढती मागणी पूर्ण करणे आणि विलीनीकरण प्रक्रियेबद्दल व्यापक जनजागृती निर्माण करणे हे या दोन्ही हेल्पलाईनच्या विलीनीकरणाचे उद्दिष्ट आहे.पुढील तीन महिन्यांसाठी, किरण हेल्पलाईनचे कॉल टेलीमानसकडे वळवले जातील आणि अखेरीस, ही पहिली हेल्पलाइन टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल.
किरण मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाइनचे टेलिमानसमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे आनंद व्यक्त करत डॉ पॉल यांनी सांगितले की, “यामुळे भार कमी होईल आणि संबंधित व्यक्तींपर्यंत सहज पोहोचण्यात मदत होईल”.
या कार्यशाळेच्या माध्यमातून दोन दिवसांच्या कालावधीत सर्व हितसंबंधितांना एका व्यासपीठावर एकत्र करून मानसिक आरोग्याप्रति भारताच्या वचनबद्धतेचा डॉ व्ही के पॉल यांनी पुनरुच्चार केला.
भारताला एक निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी ‘लोकचळवळीच्या च्या रूपाने मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.“सरकार, समुदाय, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती अशा प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असून हे झाल्यास या प्रश्नावर मात करता येईल ”, असे ते म्हणाले.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2006352)
Visitor Counter : 86