राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सूरत येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा विसावा दीक्षांत समारंभ संपन्न

Posted On: 12 FEB 2024 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (12 फेब्रुवारी 2024) सूरत येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 20 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आज प्रत्येकजण कृत्रिम बुद्धीमत्तेबद्दल (एआय) बोलत आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारे देशाच्या विकासासाठी एआय चे फायदे उपयोगात आणण्याच्या दृष्टीने अनेक कार्यक्रम राबवत आहेत. भारताच्या एआय क्षेत्रातील क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या देखील नवीन प्रकल्प सुरु करत आहेत. देशाच्या ‘एआय कौशल्यामधील तफावत’ दूर करण्यासाठी, एसव्हीएनआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थांनी कॉर्पोरेट क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि संशोधन संस्थांबरोबर काम करायला हवे, असे त्या म्हणाल्या. एआय आणि मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जागतिक शर्यतीत भारताला पुढे नेण्यामध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांची तांत्रिक कौशल्ये, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि नवोन्मेशी विचार, यासाठी विज्ञानाचा मार्गदर्शक म्हणून वापर करावा, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या मुळाशी नेहमी घट्ट जोडलेले रहावे, असे आवाहन त्यांनी केले. हे जोडलेपण, त्यांना पुढे जायला मदत करेल आणि जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असे त्या म्हणाल्या.

अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संस्थांमधील विद्यार्थिनींच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर केल्याबद्दल त्यांनी मुलींची प्रशंसा केली.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अधिकाधिक मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व एनआयटींनी कार्यक्रम, मोहिमा किंवा कार्यशाळा आयोजित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005434) Visitor Counter : 70