इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारताची डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्था आणि प्रभाव यांच्या गौरवासाठी  नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार देण्याची केंद्र सरकारची घोषणा

Posted On: 10 FEB 2024 2:20PM by PIB Mumbai

 

भारताचा विकास आणि सांस्कृतिक आशयाला ओळख मिळवून देणारे, सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणणारे आणि डिजिटल क्षेत्रात नवोन्मेष आणि सृजनशीलतेला चालना देणारे विविध प्रयत्न आणि प्रतिभा प्रकाश झोतात आणणे, हे नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डचे उद्दिष्ट आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिएटर अर्थात प्रतिभावान आशय निर्मिती अर्थव्यवस्थेची परिवर्तनकारक शक्ती आणि प्रभाव यावर सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या या दृष्टीकोनाला अनुसरून, माय जीओव्ही इंडियाने (MyGov India) भारताच्या डिजिटल परिप्रेक्षातील प्रभावी योगदानाबद्दल डिजिटल नवोन्मेशी आणि कंटेंट क्रिएटर यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय क्रिएटर पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. MyGov India अंतर्गत, 20 पेक्षा जास्त श्रेणींमध्ये अपवादात्मक सृजनशीलता आणि नवोन्मेशी उपक्रमांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून, माध्यम परिप्रेक्षात क्रांती घडवून आणत आहे, आणि तरुणांना त्यांचे स्वतःचे समुदाय तयार करण्यासाठी सक्षम बनवत आहे. हे निर्माते एका नव्या भारताचे कथानक जगासमोर मांडणारे, म्हणून उदयाला आले आहेत, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि ठामपणा आहे, आणि ते आपल्या मुळांशी घट्ट जोडलेले आहेत. सामाजिक प्रभाव निर्माण करण्यात, स्थानिक संस्कृतीला चालना देण्यामध्ये आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी, 'वोकल फॉर लोकल' चळवळीसाठी योगदान देण्यात ते आघाडीवर आहेत. नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डमध्ये कथाकथन, सामाजिक बदलाचा प्रचार, पर्यावरणीय शाश्वतता, शिक्षण, गेमिंग, यासारख्या विविध क्षेत्रांमधील उत्कृष्टता आणि प्रभाव ओळखणाऱ्या विविध श्रेणी आहेत.

1. सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार

2. द डिसप्टर ऑफ द इयर

3. सेलिब्रेटी क्रिएटर ऑफ द इयर

4. ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड  

5. सामाजिक बदल घडवणारा सर्वोत्कृष्ट क्रिएटर

6. कृषी क्षेत्रातील प्रभावशाली क्रिएटर

7. वर्षातील सांस्कृतिक राजदूत

8. आंतरराष्ट्रीय क्रिएटर पुरस्कार:

9. पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट क्रिएटर पुरस्कार

10. स्वच्छता दूत पुरस्कार

11. द न्यू इंडिया चॅम्पियन पुरस्कार

12. टेक क्रिएटर पुरस्कार

13. हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार

14. मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (पुरुष आणि महिला)

15. खाद्य श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर

16. शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर

17. गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर

18. सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर

19. सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर

20. सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटर

निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेमध्ये नामांकनाचा टप्पा, नामांकनांचे स्क्रीनिंग (निवड), त्यानंतर सार्वजनिक मतदान आणि निवड समिती (ज्युरी) द्वारे पुनरावलोकन याचा समावेश आहे. ज्युरी आणि सार्वजनिक मतांच्या एकत्रित परिणामांवर आधारित विजेत्यांची घोषणा केली जाईल.

अपेक्षित परिणाम: अधिक समावेशक, सहभागी होणारा आणि सक्षम समाज निर्माण करण्यासाठी डिजिटल मीडियाच्या परिवर्तनकारी क्षमतेला प्रेरणा देणे, ओळखणे आणि साजरे करणे, हे नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डचे उद्दिष्ट आहे. सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या डिजिटल निर्मात्यांना ओळख आणि अस्तित्व प्रदान करणे, सहयोग आणि नेटवर्किंगच्या संधी वाढवून नवीन निर्मात्यांना त्यांच्या व्यासपीठाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

MyGov India, सर्व डिजिटल निर्माते, नवोन्मेशी आणि चेंजमेकर्सना भारतामधील डिजिटल नवोन्मेश आणि त्याच्या प्रभावाचे यश साजरे करण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2004834) Visitor Counter : 113


Read this release in: Kannada , English , Urdu , Hindi