ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरईसी (REC) लिमिटेड ने जिंकला शाश्वत वित्त पुरवठा 2024 साठी ॲसेट ट्रिपल ए पुरस्कारांचा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट ग्रीन बाँड- कॉर्पोरेट पुरस्कार

Posted On: 05 FEB 2024 6:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024

ऊर्जा मंत्रालया अंतर्गत, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न श्रेणीतील उपक्रम आणि एक अग्रगण्य बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) असलेल्या आरईसी (REC) लिमिटेड ला शाश्वत वित्त पुरवठा 2024 साठी ॲसेट ट्रिपल ए पुरस्कारांचा प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट ग्रीन बाँड- कॉर्पोरेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आरईसी ला एप्रिल 2023 मध्ये $750 दशलक्ष किमतीचे युएसडी (USD) ग्रीन बॉन्ड (हरित रोखे) जारी करण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. भारताने जी 20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, भारताकडून प्रथमच जारी करण्यात आलेले हे युएसडी कर्ज रोखे असून, दक्षिण किंवा आग्नेय आशियाई देशांमधून जारी झालेले सर्वात मोठ्या मूल्याचे हरित रोखे होते. या  रोख्यांचा प्रिमियम (हप्ता) 7.5 bps इतका किमान मूल्याचा असून, या प्रदेशातील सर्वात अलीकडील सर्वोच्च मानांकन प्राप्त रोख्यांहून अधिक स्पर्धात्मक आहे. गुंतवणूकदारांनी या रोख्यांचे स्वागत केले असून, यामधून हवामान बदलाचा परिणाम कमी करण्याच्या आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यामधील आरईसी चे महत्वाचे योगदान स्पष्ट होते. हा पुरस्कार भांडवली बाजारातल्या अत्याधुनिक साधनांप्रति आरईसी लिमिटेडची असलेली अतूट वचनबद्धता आणि शाश्वत वित्तपुरवठ्याला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्यासाठी आरईसी लिमिटेडने अवलंबलेले वित्तपुरवठ्याचे अनुकूल उपाय अधोरेखित करतो. ही मान्यता सकारात्मक पर्यावरणीय प्रभाव आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना समर्थन देण्याच्या आरईसी लिमिटेडच्या समर्पित कामकाजाचा महत्वाचा टप्पा आहे.

आरईसी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार देवांगन म्हणाले: "आम्हाला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, जो शाश्वत वित्त पुरवठ्यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो आणि स्पर्धात्मक खर्चात हरित आणि अधिक शाश्वत भविष्याकडे संक्रमणाला गती देण्यासाठी आमच्या प्रयत्नांना अधोरेखित करतो. एप्रिल 2023 मध्ये जारी केलेल्या 750 दशलक्ष डॉलर्सच्या युएसडी हरित रोख्यांव्यतिरिक्त, आरईसी ने जानेवारी 2024 मध्ये JPY 61.1 अब्ज मूल्याचे आपले उद्घाटनपर युरो-येन आधील हरित रोखे देखील जारी केले, जे भारतीय कॉर्पोरेट कंपनी द्वारे जारी करण्यात आलेले युरो-येन मधील सर्वात मोठ्या मूल्याचे रोखे आहेत. अशा प्रकारे, या हरित रोख्यांद्वारे हरित आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आरईसी वचनबद्ध आहे.

ॲसेट ट्रिपल ए पुरस्कार, हे उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत. दोन दशकांहून अधिक काळ दिले जाणारे ॲसेट ट्रिपल ए पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट-श्रेणीतील संस्था ओळखण्याचे मापदंड निश्चित करतात. ॲसेट ट्रिपल ए पुरस्कार कार्यक्रम कठोर निकष निश्चित करतात. सर्वोत्तम संस्था आणि सौदे निवडताना या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाते. पुरस्कारांसाठीची निवड संपादक मंडळाद्वारे केली जाते, ज्यांना अनेक दशकांचा अनुभव आहे.  

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2002739) Visitor Counter : 82


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi