शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएम मुंबईच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित

Posted On: 27 JAN 2024 5:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आज भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मुंबईच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज के. तिवारी, आयआयएम मुंबईच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, इतर मान्यवर आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधान यांनी आयआयएम मुंबईचा नवीन लोगो आणि संस्थेच्या वसतिगृहाचे डिजिटल पद्धतीने अनावरण केले.

या कार्यक्रमात बोलताना प्रधान यांनी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (निटी ) चे भारतीय व्यवस्थापन संस्थे (आयआयएम ) मध्ये रूपांतर करून बिझनेस स्कूलची मुंबईची दीर्घकाळची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. हे नामकरण प्रतिकात्मकतेपेक्षा अधिक आहे, कारण ते परिवर्तनाचे उत्प्रेरक आहे, जे उत्कृष्ट मनुष्यबळ निर्माण करेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘GenZ’ ला अमृत पीढी असे नाव दिल्याची सर्वांना आठवण करून देत प्रधान म्हणाले की ही पिढी सामाजिक-आर्थिक बदलाची उत्प्रेरक आहे आणि पुढील 25 वर्षे जागतिक आणि सामाजिक समस्यांवर उपाय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गरीब, वंचित समुदाय आणि महिलांच्या शिक्षणातील सहभागामध्ये विक्रमी सुधारणा झाली आहे आणि हे ज्ञानाभिमुख समाजाचे द्योतक आहे असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मांडलेल्या कल्पनेनुसार, युवा वर्गाने नोकरी शोधण्यावर समाधान न मानता नोकरी प्रदाता बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यावर प्रधान यांनी भर दिला. उद्योजकता आणि नवीन युनिकॉर्न तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यातील युनिकॉर्नमध्ये रूपांतरित होणाऱ्या कल्पना साकार करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. देशातील अव्वल बिझनेस स्कूल म्हणून उदयाला येण्याच्या दिशेने संस्थेने काम करावे, असे ते म्हणाले. ही संस्था उत्कृष्टतेचे जागतिक केंद्र तसेच चारित्र्यनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती करणारी संस्था बनेल, अशी अपेक्षा प्रधान यांनी व्यक्त केली..

विशेषत: विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रधान यांनी त्यांना जागतिक समुदायाप्रती 'कर्तव्यबोध' (कर्तव्याची जाणीव ) ठेवण्याचे आवाहन केले आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन केले. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनावा यासाठी संस्थेला जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि विकसित भारताच्या निर्मितीत आपली भूमिका पार पाडावी लागेल, असे प्रधान म्हणाले.

शशी किरण शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले की आयआयएम मुंबई, संशोधन आणि उद्योगांना जोडण्याला चालना देईल. प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी निटीचे आयआयएम मुंबई असे नामकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान, शिक्षण मंत्री, विशेष समितीचे अध्यक्ष आशिषकुमार चौहान आणि आयआयएम मुंबईच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचे आभार मानले. त्यांनी संस्थेचे प्रगती पुस्तक देखील सामायिक केले.

या कार्यक्रमात एकूण 1013 विद्यार्थ्यांना  पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये याच संस्थेत शिकणारे  32  विद्यार्थी,  PGDIE, PGDIM, PGDMM, PGDPM आणि PGDSM अशा सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील  955 पदव्युत्तर विद्यार्थी आणि 26 व्हीएलएफएम विद्यार्थ्यांचा समावेश होता.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000103) Visitor Counter : 141


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia