विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

प्रजासत्ताक दिन संचलनात सीएसायआर च्या चित्ररथाने जम्मू आणि काश्मीरमधील लॅव्हेंडरच्या लागवडीद्वारे सुरू झालेल्या जांभळ्या क्रांतीवर टाकला प्रकाश.


या चित्ररथाने विकसित भारत संकल्पने अंतर्गत, सीएसायआर ची लॅब-टू-मार्केट यशोगाथा केली अधोरेखित.

भारतातील पहिल्या सीएसायआर च्या कॉम्पॅक्ट ई-ट्रॅक्टरला सर्व महिलांच्या चित्ररथात मिळाले स्थान.

Posted On: 27 JAN 2024 10:37AM by PIB Mumbai

 वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथातून जम्मू आणि काश्मीरमधील लॅव्हेंडरच्या लागवडीद्वारे जांभळ्या क्रांतीची सुरुवात दर्शवण्यात आली.  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वैज्ञानिक प्रयत्नांमधून जम्मू आणि काश्मीरमध्ये लॅव्हेंडरच्या लागवडीत आणि लॅव्हेंडर पासून तयार होणाऱ्या उत्पादनांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या विकासाने लॅव्हेंडरला प्रयोगशाळेतून  प्रत्यक्ष बाजारपेठेत नेले असून जम्मू आणि काश्मीरमध्ये यावर आधारित अनेक कृषी-स्टार्ट-अप सुरू झाले आहेत. या चित्ररथातून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने विकसित केलेले भारतातील पहिले महिला स्नेही, कॉम्पॅक्ट, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील प्रदर्शित करण्यात आले. प्रजासत्ताक दिन संचलन 2024 च्या विकसित भारत या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ खूपच नेत्रसुखद होता.

​​​​​​

 सीएसायआर ने जम्मू आणि काश्मीरच्या समशीतोष्ण प्रदेशात लागवडीसाठी योग्य असलेल्या लॅव्हेंडरची एक नवी जात विकसित केली तसेच शेतकऱ्यांना याची मोफत रोपे आणि आवश्यक त्या कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्रदान केली. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात लॅव्हेंडरपासून तेल काढण्यासाठी डिस्टिलेशन युनिट्स देखील स्थापित केली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये लॅव्हेंडर लागवडीला मिळालेल्या यशामुळे याल ‘पर्पल रिव्होल्यूशन’ अर्थात जांभळी क्रांती असे नवे संबोधन मिळाले आहे. 


संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथाचा पुढचा भाग लॅव्हेंडर या सुवासिक फुलांच्या लागवडीचे आणि जम्मू आणि काश्मीरमधील मधील 21व्या शतकातील सक्षम महिला शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक रुप दर्शवत होता. चित्ररथाच्या मधल्या भागात सीएसायआर मधील शास्त्रज्ञांनी केलेले वैज्ञानिक प्रयत्न आणि शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य उपलब्ध करून देणे तसेच लॅव्हेंडरच्या शेतात काम करणारे शेतकरी यांचे दर्शन घडवले होते. 

चित्ररथावर कृषी-यांत्रिक तंत्रज्ञानाच्या अंतर्गत, सीएसायआर द्वारे स्वदेशात विकसित भारतातील पहिले महिला-अनुकूल कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर PRIMA ET11 चे देखील प्रदर्शन करण्यात आले. कृषी-तांत्रिक घडामोडींवर प्रकाश टाकत, लॅव्हेंडरच्या फुलांपासून तेल काढण्यासाठी आवश्यक असणारे डिस्टिलेशन युनिट देखील दर्शविण्यात आले होते.


 चित्ररथाच्या मागील भागात भारतातील कृषी-स्टार्ट-अपची संकल्पना आणि लॅव्हेंडर आधारित उत्पादनांची (परफ्यूम, तेल, अगरबत्ती) निर्यात दर्शवण्यात आली होती. केवळ महिला असलेल्या या चित्ररथावर सरकारच्या वैज्ञानिक विकास उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न, नारी शक्ती, कृषी स्टार्ट-अप आणि जागतिक व्यवसाय वृद्धी या क्षेत्रातील उपलब्धी दर्शवण्यात आल्या होत्या. 

******
MI/S. Mukhedkar/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999996) Visitor Counter : 115


Read this release in: English , Manipuri , Urdu , Hindi