वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कार्यशक्तीत महिलांचा समावेश भारताचा विकसित देश बनण्याच्या प्रवासाला लाभदायक ठरेल: पीयूष गोयल

Posted On: 26 JAN 2024 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2024

 

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवोन्मेषक आणि स्वयंउद्योजकांशी संवाद साधला. यावेळी नवी दिल्लीत त्यांच्याशी बोलतांना, गोयल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात, महिला-प्रणित विकासाचे आज दर्शवण्यात आलेले प्रभावी चित्र, नारी शक्ती अभिव्यक्त करणारे आहे, असे गौरवोद्गार काढले. संघटित आणि औपचारिक श्रमशक्तीत, महिलांचा सहभाग भारताच्या विकसित देश बनण्याच्या प्रवासाला अधिक बळ आणि गती देणारा ठरेल, इतकेच नाही, तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही भर घालणारा ठरेल,  असे गोयल म्हणाले.

स्टार्टअप व्यवस्थेत, अधिकाधिक महिला सहभागी होत असल्याबद्दल तसेच, अनेक अभिनव कल्पना आणत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत,  गोयल म्हणाले की, आज 20 युनिकॉर्नचे नेतृत्व महिला करत आहेत आणि महिलांमध्ये पेटंट धारकांची संख्या वाढली आहे. भारतीय पेटंट कार्यालयाने गेल्या 10 महिन्यांत विक्रमी 75,000 पेटंट मंजूर केल्याची माहिती गोयल यांनी उपस्थितांना दिली. यातून, अभिनव संशोधन आणि वेगाने वाढ करण्याची भारताची क्षमता दिसून येते, असे ते म्हणाले.

व्यवसाय सुलभतेविषयी बोलतांना, उद्योजकांवरचे ओझे कमी करण्याच्या लक्ष केंद्रित प्रयत्नात देशभरातील 40,000 अनुपालने एकतर रद्द करण्यात आली आहेत किंवा सुलभ करण्यात आली आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.

देशातील तरुणांवर विश्वास व्यक्त करत, गोयल यांनी सांगितले की, तरुणांचा, विशेषतः महिलांचा सामूहिक प्रयत्न भारताला भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र बनवेल आणि भारताची अर्थव्यवस्था 35  ट्रिलियन डॉलर्सवर नेईल. 'लखपती दीदी योजना' च्या शुभारंभामुळे भारत वेगाने विकसित होण्यास सज्ज आहे असे सांगत, उद्योजक आणि नवोन्मेषक या विकास गाथेत आघाडीवर असतील असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

 

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1999912) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi