शिक्षण मंत्रालय

शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-2022 प्रसिद्ध

Posted On: 25 JAN 2024 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

 

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आज उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण (एआयएसएचई) 2021-2022 प्रसिद्ध केले. मंत्रालय 2011 पासून हे सर्वेक्षण आयोजित  करत आहे, ज्यामध्ये एआयएसएचईकडे नोंदणीकृत देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. यामध्ये  विद्यार्थी नावनोंदणी, शिक्षक, मूलभूत  माहिती इत्यादी सारख्या विविध मापदंडांवर विस्तृत माहिती संकलित केली जाते.

सर्वेक्षणातील प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

विद्यार्थी नोंदणी

 • उच्च शिक्षणातील एकूण नावनोंदणी 2020-21 मधील 4.14 कोटींवरून 2021-22 मध्ये सुमारे 4.33 कोटी झाली आहे. 2014-15 मधील 3.42 कोटी नोंदणीत सुमारे 91 लाख (26.5%) इतकी वाढ झाली आहे.
 • मुलींची नावनोंदणी 2020-21 मधील 2.01 कोटींवरून 2021-22 मध्ये 2.07 कोटीपर्यंत वाढली आहे. 2014-15 मधील 1.57 कोटी इतक्या मुलींच्या नोंदणीत सुमारे 50 लाखांनी (32%) वाढ झाली आहे.
 • 2014-15 मधील 46.07 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी 66.23 लाख (44% ची वाढ) आहे.
 • 2020-21 मधील 29.01 लाख आणि 2014-15 मधील 21.02 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींची नावनोंदणी वाढून 31.71 लाख झाली आहे. 2014-15 पासून यात 51% वाढ झाली आहे.         
 • अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची नावनोंदणी   2014-15 मधील 16.41 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये वाढून 27.1 लाख (65.2% वाढ) झाली आहे.
 • अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनींची नावनोंदणी   2020-21 मधील 12.21 लाख आणि 2014-15 मधील 7.47 लाखांवरून 2021-22 मध्ये वाढून 13.46 लाख झाली आहे. 2014-15 पासून यात 80% इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.
 • ओबीसी विद्यार्थ्यांची नावनोंदणी देखील 2014-15 मध्ये 1.13 कोटींवरून वाढून 2021-22 मध्ये 1.63 कोटी झाली आहे. 2014-15 पासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत सुमारे 50.8 लाख (45%) इतकी लक्षणीय वाढ झाली आहे.
 • इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या नोंदणीत 2014-15 मधील 52.36 लाखांवरून वाढून ती 2021-22 मध्ये 78.19 लाख झाली आहे.  2014-15 पासून इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या नोंदणीत एकूण 49.3% वाढ झाली आहे.
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची नोंदणी 2014-15 मधील 21.8 लाखांवरून वाढून 2021-22 मध्ये 30.1 लाख (38% ची वाढ) झाली आहे.  अल्पसंख्याक विद्यार्थिनीची नोंदणी 2014-15 मधील 10.7 लाखांवरून वाढून 2021-22 मध्ये 15.2 लाख (42.3% वाढ) झाली आहे.
 • ईशान्येकडील राज्यात एकूण विद्यार्थी नोंदणी 2014-15 मधील 9.36 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 12.02 लाख झाली आहे.  2021-22 मध्ये ईशान्येकडील राज्यांमध्ये विद्यार्थिनींची नोंदणी 6.07 लाख आहे, जी विद्यार्थ्यांच्या 5.95 लाख नोंदणी पेक्षा जास्त आहे.
 • जीईआर अर्थात एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 मधील 23.7 वरून वाढून 2021-22 मध्ये 28.4 पर्यंत पोहोचला आहे [ 18-23 वर्षे वयोगटासाठी 2011 मधील लोकसंख्येच्या अंदाजानुसार]. विद्यार्थिनींचे एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 मधील 22.9 वरून वाढून 2021-22 मध्ये 28.5 इतके झाले आहे.
 • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण 2014-15 मधील 18.9 वरून वाढून 2021-22 मध्ये 25.9 वर पोहोचले आहे, तर अनुसूचित जातीतील विद्यार्थिनींचे एकूण नोंदणी प्रमाण (GER) 2014-15 मधील 18.1 वरून वाढून 2021-22 मध्ये 26 वर पोहोचले आहे.
 • अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण (GER) 2014-15 मधील 13.5 वरून वाढून 2021-22 मध्ये 21.2 इतके झाले आहे.  अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या एकूण नोंदणी प्रमाणात 2014-15 मधील 12.2 वरून नेत्रदीपक प्रगती करत 2021-22 मध्ये ते 20.9 वर पोहोचले आहे.
 • लिंग समानता निर्देशांक (GPI), महिलांचे एकूण नोंदणी प्रमाण (GER) आणि पुरुषांचे एकूण नोंदणी प्रमाण (GER) 2021-22 मध्ये 1.01 आहे. लिंग समानता निर्देशांक (GPI) 2017-18 पासून 1 च्या वर राहिला आहे म्हणजेच, महिला एकूण नोंदणी प्रमाण सलग पाचव्या वर्षी पुरुषांच्या एकूण नोंदणी प्रमाणापेक्षा जास्त आहे.
 • अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) 2021-22 मधील प्रतिसादानुसार, एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे 78.9% विद्यार्थी पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये तर 12.1% पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत आहेत.
 • अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) 2021-22 नुसार पदवीपूर्व स्तरावरील विषयांमध्ये, कला (34.2%), त्यानंतर विज्ञान (14.8%), वाणिज्य (13.3%) आणि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (11.8%) या शाखांमध्ये सर्वाधिक नावनोंदणी झाली आहे. 
 • उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण 2021-22 नुसार  पदव्युत्तर स्तरावरील शाखांमध्ये , अधिकाधिक विद्यार्थ्यांनी  सामाजिक शास्त्र   (21.1%) त्यानंतर विज्ञान (14.7%) या शाखांमध्ये  प्रवेश घेतला आहे.
 • पीएच.डी.ला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या  2014-15 मधील 1.17 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये   81.2% ने वाढून 2.12 लाख झाली आहे.
 • पीएच.डी. ला प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्या 2014-15 मधील 0.48 लाखांवरून 2021-22 मध्ये  दुप्पट होऊन 0.99 लाख झाली आहे. 2014-15 ते 2021-22 या कालावधीत पीएच.डी. ला प्रवेश घेणाऱ्या महिलांची संख्येत 10.4% वार्षिक वाढ आहे.
 • 2021-22 मध्ये, पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी आणि एम.फिल स्तरावरील एकूण प्रवेशांपैकी 57.2 लाख विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत  प्रवेश घेतला आहे,  ज्यामध्ये महिला विद्यार्थ्यांची (29.8 लाख) संख्या पुरुष विद्यार्थ्यांपेक्षा (27.4 लाख) अधिक आहे.
 • एकूण विद्यापीठांपैकी 58.6% सरकारी विद्यापीठे, एकूण प्रवेश नोंदणीमध्ये  73.7% योगदान देतात, एकूण प्रवेशांमधील खाजगी विद्यापीठांचा वाटा 26.3% आहे
 • उत्तीर्ण झालेल्यांची  एकूण संख्या 2020-21 मधील  95.4 लाखांच्या तुलनेत 2021-22 मध्ये 1.07 कोटी झाली आहे.
 • 2021-22 मध्ये विद्यापीठात विविध पायाभूत सुविधांची उपलब्धता:
  • ग्रंथालय  (99%)
  • प्रयोगशाळा  (88%)
  • संगणक केंद्रे (93%)
  • कौशल्य विकास केंद्रे  (71%)
  • क्रीडांगणे  (91%)

संस्थांची संख्या

 • देशभरात  नोंदणीकृत विद्यापीठे/विद्यापीठ स्तरावरील संस्थांची एकूण संख्या 1,168 इतकी आहे, 45,473 महाविद्यालये आणि 12,002 स्वतंत्र संस्था  आहेत .
 • 2014-15 पासून देशात एकूण 341 विद्यापीठे/विद्यापीठ स्तरावरील संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.
 • देशातील 17 विद्यापीठे (त्यापैकी 14 राज्य सरकारची  सार्वजनिक विद्यापीठे आहेत) आणि 4,470 महाविद्यालये केवळ महिलांसाठी आहेत.

प्राध्यापक वर्ग

 • 2021-22 मध्ये देशातील एकूण कार्यरत प्राध्यापक /शिक्षकांची संख्या 15.98 लाख आहे, त्यापैकी सुमारे 56.6% पुरुष आणि 43.4% महिला आहेत.
 • महिला प्राध्यापक /शिक्षिका यांची  संख्या 2014-15 मधील  5.69 लाख (2014-15 पासून 22% वाढ) वरून 2021-22 मध्ये 6.94 लाख झाली आहे.
 • प्रति 100 पुरुष शिक्षकांच्या तुलनेत  2020-21 मधील  75 वरून 2021-22 मध्ये 77 पर्यंत  महिला शिक्षकांच्या संख्येत  किरकोळ  वाढ झाली आहे.

 

* * *

R.Aghor/JPS/Sushma/Shraddha/Sonal C/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1999764) Visitor Counter : 154


Read this release in: English , Hindi