वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि डॉमिनिकन रिपब्लिक दरम्यान संयुक्त वित्तीय आणि व्यापार समितीच्या स्थापनेसाठी प्रोटोकॉलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
24 JAN 2024 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा वाणिज्य विभाग आणि डॉमिनिकन रिपब्लिकचे परराष्ट्र मंत्रालय यांच्यात संयुक्त वित्तीय आणि व्यापार समिती स्थापन करण्यासाठी प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
भारत आणि डोमिनिकन प्रजासत्ताक यांच्यातील द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण असून सर्व क्षेत्रांमध्ये ते आणखी दृढ होत आहेत. सध्या, भारत आणि डोमिनिकन रिपब्लिक यांच्यात व्यापार आणि वाणिज्य संबंधी कुठलीही द्विपक्षीय संस्थात्मक व्यवस्था नाही. भारत प्रामुख्याने डोमिनिकन रिपब्लिककडून सोने आयात करतो आणि त्यांना औषधे, सागरी उत्पादने, मोटर वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहने इत्यादींची निर्यात करतो.
संयुक्त वित्तीय आणि व्यापार समितीची स्थापना भारत आणि डोमिनिकन रिपब्लिक यांच्यातील आर्थिक संबंध मजबूत करेल आणि एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल तसेच चर्चा, माहिती, ज्ञान आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, परिणामी व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल. हा प्रोटोकॉल बहुतांश लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन बाजारपेठांसाठी एक प्रभावी प्रवेशद्वार ठरू शकतो.
संयुक्त समिती विविध अधिकारी आणि त्यांचे समकक्ष यांच्यात माहितीची देवघेव करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. यामुळे वस्तू आणि सेवांचा व्यापार सुलभ होण्यास मदत होईल आणि परिणामी उभय देशांमधील व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.
संयुक्त वित्तीय आणि व्यापार समितीची स्थापनेमुळे परस्पर हिताच्या भारतीय उत्पादनांच्या निर्यातीतील आव्हाने दूर होण्यात मदत होईल आणि भारतात उत्पादित औषध, वाहने आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीला चालना देण्याचा मार्ग सुकर करेल आणि आत्मनिर्भर भारतासाठी परकीय गंगाजळीत वाढ होईल.
* * *
R.Aghor/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999281)
Visitor Counter : 107