माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वार्तांकनासाठी उभारले मिडिया सेंटर
अयोध्या धाम येथील राम कथा संग्रहालयातील अत्याधुनिक प्रसार माध्यम केंद्र सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2024 6:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्येतील राम लल्लाच्या बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अयोध्या धाम येथील राम कथा संग्रहालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रसार माध्यम केंद्र उभारले आहे. हे प्रसार माध्यम केंद्र 13,000 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे आणि याच्या मुख्य परिसराची लांबी 40 मीटर तर रुंदी 25 मीटर असून यात 340 वर्कस्टेशन्स आहेत आणि 1,000 प्रसार माध्यम प्रतिनिधींना सामावून घेण्याची क्षमता आहे.

या वातानुकूलन सुविधेसह सज्ज असलेल्या प्रसार माध्यम केंद्रात पत्रकार परिषद कक्ष, मीडिया ब्रीफिंग रूम, मीडिया लाउंज, उपहारगृह, हाय-स्पीड वाय-फाय इंटरनेट, फिरते स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यमांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये लॅपटॉपसाठी योग्य जागा, फोटोकॉपीर, प्रिंटर, अधूनमधून अल्पोपाहार आणि खाद्यपदार्थांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना रामलल्ला प्राणप्रतिष्ठा स्पष्टपणे पाहता यावी यासाठी या प्रसार माध्यम केंद्रात 9 फूट लांब आणि 16 फूट रुंद असे 2 एलईडी टीव्हीही बसवण्यात आले आहेत.

लखनौ आणि अयोध्या दरम्यान पत्रकारांसाठी वाहतूक सुविधा
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्या धाममध्ये वार्तांकनासाठी येणार्या प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी लखनौ ते अयोध्या दरम्यान वाहतूक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रसार भारती यांच्याकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. दूरदर्शन हा संपूर्ण सोहळा डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनेलवर 4K गुणवत्तेत थेट प्रसारित करेल.
22 जानेवारी 2024 रोजी दूरदर्शनच्या 40 कॅमेऱ्यांद्वारे या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती या सोहळ्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती आणि प्रसार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी दिली. दूरदर्शन 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील या सोहळ्याचे क्लीन फीड ANI आणि PTI सोबत सामायिक करेल, असेही ते म्हणाले.

अयोध्या धाम येथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा.
अयोध्या धाममध्ये लोकांना पुरेशा आणि जलद वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अयोध्येतील वैद्यकीय मदत आणि इतर आरोग्य सुविधांची माहिती स्थानिक प्रशासन आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लोकांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी जेपीएनए ट्रॉमा सेंटर आणि नवी दिल्लीतील एम्स चे वैद्यकीय चमू अयोध्या धाममध्ये विविध ठिकाणी उपस्थित आहेत. प्राणप्रतिष्ठा समारंभ आणि संबंधित कार्यक्रमादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी अयोध्येत सरकारने भीष्म आपत्कालीन प्रतिसाद सुविधा देखील स्थापित केली आहे.
अयोध्या धाममध्ये वाहतूक व्यवस्था नियंत्रण
उत्तर प्रदेशातील अयोध्या धाममधील विना बाधा वाहतुकीच्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून, वाहतूक पोलिस आणि मॅपल्स मॅपमायइंडिया यांनी अयोध्येचा प्रवास सुरळीत, सुरक्षित आणि त्रासमुक्त होईल हे सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1998423)
आगंतुक पटल : 152