विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाला भेट दिली आणि संबोधित केले
Posted On:
20 JAN 2024 2:10PM by PIB Mumbai
भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या (आयआयएसएफ) आजच्या चौथ्या दिवशी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. 17 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य विज्ञान महोत्सवाने विज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील विद्वानांना एकत्र आणले, तसेच नाविन्याचा शोध आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत केली.
आपल्या भाषणात मनोहर लाल खट्टर यांनी विज्ञान हे समाजाला कोणत्याही भेदभावाशिवाय देत असलेल्या अमर्याद लाभांचा उल्लेख केला. भविष्य घडविण्यामध्ये विज्ञानाचे असलेले महत्त्व ओळखून त्यांनी एका महत्त्वपूर्ण घोषणेच्या माध्यमातून विज्ञानाला समाजाशी जोडण्याप्रति वचनबद्धता व्यक्त केली.
खट्टर यांनी फरीदाबाद (हरियाणा) येथे 50 एकर क्षेत्रावरील अत्याधुनिक सायन्स सिटीच्या विकासाच्या योजनांची घोषणा केली. वैज्ञानिक शोध, शिक्षण आणि सहभागासाठी एक समर्पित जागा तयार करणे, तसेच लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये कुतूहल आणि संशोधनाची वृत्ती जोपासणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
फरिदाबादमधील प्रस्तावित सायन्स सिटी हे वैज्ञानिक नवोन्मेष, शिक्षण आणि प्रसाराचे केंद्र बनण्यासाठी तयार आहे. संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी ते एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
आपल्या घोषणेमध्ये मनोहर लाल खट्टर यांनी युवकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती जोपासण्याचे तसेच नवोन्मेष आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारी परिसंस्था तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सायन्स सिटीची कल्पना एक गतिशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे, जी वैज्ञानिक जागरूकता वाढवण्यात, शिकण्याची आवड निर्माण करण्यात आणि वैज्ञानिकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विज्ञान आणि तंत्रज्ञानासह जीवनाच्या सर्व क्षेत्रात पुढे मार्गक्रमण करत आहे असे ते म्हणाले.
आयआयएसएफ सारखे सार्वजनिक सहभाग असलेले मंच नागरिकांमध्ये वैज्ञानिक वृत्तीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असे खट्टर यांनी अधोरेखित केले. हा महोत्सव वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करतो, गुंतागुंतीच्या संकल्पना सहजपणे उलगडून सांगतो आणि विज्ञानाचे परिवर्तनात्मक सामर्थ्य प्रदर्शित करतो, यावर त्यांनी भर दिला.
प्रा. अभय करंदीकर (सचिव,विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग), डॉ. शिवकुमार शर्मा (राष्ट्रीय संघटन सचिव, विज्ञान भारती), डॉ. अरविंद सी रानडे (मुख्य समन्वयक, आयआयएसएफ 2023) आणि डॉ. पी. एस. गोयल (अध्यक्ष, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन) याप्रसंगी उपस्थित होते.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998103)
Visitor Counter : 94