विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सी. एस. आय. आर.- राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एन. आय. ओ.) कोलंबो सुरक्षा परिषदेच्या (सी. एस. सी.) सदस्य देशांसाठी महिनाभराचा समुद्रशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला सुरू

Posted On: 19 JAN 2024 3:06PM by PIB Mumbai

पणजी , 19 जानेवारी 2024


समुद्रशास्त्र क्षेत्रात सहकार्य आणि क्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, सी. एस. आय. आर.- राष्ट्रीय समुद्र विज्ञान  संस्थेने (एन. आय. ओ.) कोलंबो सुरक्षा परिषदेच्या (सी. एस. सी.) सदस्य देशांसाठी महिनाभराचा समुद्रशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सत्र 15 जानेवारी 2024 रोजी झाले.

हा शैक्षणिक उपक्रम नोव्हेंबर 2022 मध्ये गोवा आणि हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सी. एस. सी. समुद्रशास्त्रज्ञ आणि जलतज्ज्ञ परिषदेचा थेट परिणाम आहे. या परिषदेनंतर, सी. एस. सी. देशांच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत हिंद महासागर प्रदेशात दोन मोहिमा राबवल्या. डिसेंबर 2023 मध्ये सुरू झालेली अंटार्क्टिकमधील आणखी एक संयुक्त मोहीम सध्या सुरू आहे.

उद्घाटनपर भाषणादरम्यान, सी. एस. आय. आर.-एन. आय. ओ. चे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह  यांनी हिंद महासागर प्रदेशातील गुंतागुंत समजून घेण्यात किनारपट्टीवरील राष्ट्रांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. जीवशास्त्रीय समुद्रशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक आणि प्रमुख डॉ. मंगुएश उत्तम गौन्स हे या महिनाभर चालणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे समन्वयक आहेत.

या अभ्यासक्रमातील सहभागी, हिंद महासागर आणि जगभरातील हवामान बदलाच्या सखोल परिणामांवर मंथन करून समुद्रशास्त्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करतील. या कार्यक्रमात परस्परसंवादी चर्चा, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम यांचा समावेश आहे.

हा अभ्यासक्रम कल्पनांचे  समृद्ध आदानप्रदान  सुलभ करेल आणि समुद्रशास्त्रातील ज्ञानाच्या वाढत्या प्रमाणाला हातभार लावेल अशी अपेक्षा आहे. पर्यावरणीय आव्हानांचा सामना करणे, शाश्वत पद्धतींना चालना देणे आणि वैज्ञानिक सहकार्याला चालना देण्यासाठी सहभागी राष्ट्रांची क्षमता वाढवणे हा या सहभागाचा उद्देश आहे.

S.Kakade/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 




(Release ID: 1997754) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi