उपराष्ट्रपती कार्यालय

देशाला सकारात्मक दिशा देण्यासाठी विधिमंडळात सामंजस्याने काम करणे ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी - उपराष्ट्रपती

Posted On: 16 JAN 2024 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

देशाच्या प्रगतीसाठी  पक्षभेद विसरून एकत्रितपणे काम करणे, ही विधिमंडळातील सर्व सदस्यांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे.

राष्ट्राची  प्रगती आणि विकासाचा आधार  विधिमंडळ असून राज्यशास्त्रातील 'राज्य' या संकल्पनेतील कार्यपालिका आणि न्यायपालिका अशा सर्व घटकांमध्ये संतुलन राखण्यात विधिमंडळ महत्त्वपूर्ण  भूमिका  बजावते, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जयपूर येथे आज राजस्थान विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना उपराष्ट्रपती आज संबोधित करत होते. जाणीवपूर्वक व्यत्यय आणि गोंधळ निर्माण करण्याच्या डावपेचांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. असे डावपेच फार काळ परिणामकारक ठरत नाहीत आणि सदनात सरकारकडे उत्तरदायित्व मागण्याच्या संधींपासून वंचित ठेवतात. अनेकदा लोक तक्रारनिवारणासाठी रस्त्यांवर उतरतात, कारण अशा मुद्द्यांकडे सदनात लक्ष वेधले जात नाही, असे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

विरोधी पक्ष सदनाचा कणा असल्याचा संदर्भ देऊन सदस्यांनी लोककल्याणाच्या दृष्टीने आपले भिन्न दृष्टिकोन जरूर मांडावे, त्याकडे वादाचे मुद्दे म्हणून पाहण्याऐवजी लोककल्याणाचा विचार करावा. राष्ट्रहित सर्वोच्च असून त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.

राजकीय पक्षांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या निष्पक्षतेविषयी शंका बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. लोकप्रतिनिधींना आपली मते सदनासमोर स्वतंत्रपणे मांडता आली पाहिजेत. संविधान सभेच्या कामकाजाचा आदर्श ठेवण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींना करत संसदीय लोकशाहीचा पाया म्हणून संवाद, परिसंवाद, चर्चा आणि विचारविनिमय हा मार्ग कायम ठेवण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.


S.Kane/S.Kakade/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1996750) Visitor Counter : 62


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil