वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या भारताच्या प्रवासात स्टार्ट अप कंपन्यांची मध्यवर्ती भूमिका : पीयूष गोयल

Posted On: 16 JAN 2024 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

वर्ष 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात स्टार्ट अप कंपन्यांची मध्यवर्ती भूमिका आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज स्टार्टअप पुरस्कार आणि राज्य मानांकन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या आठ वर्षांत स्टार्टअप क्षेत्रात झालेल्या लक्षणीय प्रगतीची प्रशंसा करत, गोयल म्हणाले की, एकेकाळी स्टार्ट अप कंपन्या ही कल्पना देशात नवखी होती मात्र, आज ह्याच संकल्पना राष्ट्रीय मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

विविध क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्या, मग ते वैद्यकीय तंत्रज्ञान असो,  वित्त तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान असो किंवा मग हवाई क्षेत्र, ड्रोन अणि सिम्युलेटर्सचे क्षेत्र असो, या कंपन्या अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. पर्यटन क्षेत्रात अद्याप अनेक अस्पर्श्य संधी आहेत, असे सांगत, स्टार्ट अप कंपन्यांनी शाश्वत पर्यटनाच्या क्षेत्रात, अभिनव कल्पना शोधाव्यात असे आवाहन गोयल यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘वेड-इन-इंडिया’ म्हणजेच, ‘भारतात येऊन विवाह करा’ संकल्पनेचा उल्लेख करत, त्याकडेही स्टार्ट अप म्हणून बघता येईल, अशी सूचना त्यांनी केली. व्हायब्रंट गुजरात मध्ये पंतप्रधान म्हणाले होते, की भारताचे प्राधान्य आज, नव्या युगातील कौशल्ये, भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांना आहे, असा उल्लेखही गोयल यांनी यावेळी केला.

एमएएआरजी पोर्टलच्या माध्यमातून, मार्गदर्शन, सल्लागार, सहाय्य, लवचिकता आणि स्टार्ट अप इंडियाचा विकास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) वर स्टार्टअप्स घेणे आणि त्याचा प्रसार (आऊटरिच) याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. स्टार्टअप्सना सरकारी ई-मार्केटप्लेसवर घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. कारण स्टार्टअप्ससाठी शुल्क कमी केले गेले आहे असे सांगत, गोयल यांनी स्टार्टअप्सना पेटंट, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क संरक्षणासाठी नोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले.

मार्च 2024 मध्ये, देशात ‘स्टार्ट अप महा कुंभ’ आयोजित केला जाणार आहे, अशी घोषणा गोयल यांनी केली. स्टार्ट अप व्यवस्थेला, सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळत राहील, अशी हमी त्यांनी दिली. स्वयंउद्योजकांनी देशातील मोठ्या ग्राहक पेठेचा वापर करावा, आणि उदयोन्मुख स्टार्ट अप व्यवस्थेतून विकसित स्टार्ट अप व्यवस्थेकडे वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गोयल यांच्या हस्ते, स्टार्टअप पुरस्कार आणि राज्य मानांकन पुरस्कार प्रदान करण्यात आले.  गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांनी सर्वोच्च पुरस्कार पटकावले.

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2023 बद्दल अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा.

https://www.startupindia.gov.in/srf-2022/result-2022.html

https://www.startupindia.gov.in/nsa2023results/

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1996675) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati