खाण मंत्रालय
अर्जेंटिनामधील लिथियम अन्वेषण आणि खाण प्रकल्पासाठी भारताचा करार
भारत आणि अर्जेंटिना या दोघांसाठी ऐतिहासिक दिवस – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
Posted On:
15 JAN 2024 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (काबिल) आणि अर्जेंटिनाच्या कॅटामार्का प्रांतातील CATAMARCA MINERA Y ENERGÉTICA SOCIEDAD DEL ESTADO (CAMYEN SE) या सरकारी मालकीच्या कंपनीत आज 15 जानेवारी 2024 रोजी अर्जेंटिना येथे झालेल्या कराराद्वारे भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
या स्वाक्षरी समारंभाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी आभासी माध्यमातून उपस्थित होते.
“भारत आणि अर्जेंटिना या दोघांसाठीही हा ऐतिहासिक दिवस आहे कारण आम्ही काबिल आणि कॅमीन यांच्यातील करारावर स्वाक्षरी करून द्विपक्षीय संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहोत. हे पाऊल शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संक्रमण निरंतर ठेवण्यात केवळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार नाही तर भारतातील विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांसाठी एक लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी देखील सुनिश्चित करेल,” असा विश्वास प्रल्हाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतातील सरकारी कंपनीचा हा पहिला लिथियम अन्वेषण आणि खाण प्रकल्प आहे.
अर्जेंटिना हा चिली आणि बोलिव्हियासह जगातील एकूण लिथियम संसाधनांपैकी निम्म्याहून अधिक लिथियम संसाधनांसह “लिथियम ट्रँगल” चा भाग आहे आणि आणि लिथियम संसाधनांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा, लिथियम साठ्यांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वाधिक उत्पादनात जगातील चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून गणला जातो.
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1996426)
Visitor Counter : 232