पंतप्रधान कार्यालय

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश

Posted On: 12 JAN 2024 9:52AM by PIB Mumbai

सियावर रामचंद्र की जय !

माझ्या प्रिय देशवासियांनो राम राम!

जीवनातील काही क्षण दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात अनुभवता येतात.

आज आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र प्रभू श्रीरामाच्या भक्तीचे अनोखे वातावरण! चारही दिशांना राम नामाचा गजर, राम भजनांचे अलौकिक  स्वरमाधुर्य! प्रत्येकजण 22 जानेवारीच्या त्या ऐतिहासिक पवित्र क्षणाची वाट पाहत आहे आणि आता अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की मलाही या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी कल्पनातीत अनुभूतीचा  काळ आहे.

मी भावूक झालो आहे, भावविवश झालो आहे! माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अशा मनोवस्थेतून जात आहे, आगळ्या भाव-भक्तीची अनुभूती घेत आहे. माझ्या अंतर्मनाचा  हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे. तो मांडण्याचे माझ्या मनात असले  तरी त्याची गहनता, व्याप्ती आणि तीव्रता मी शब्दात मांडू शकत नाही. तुम्ही देखील माझी मनोवस्था चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता.

जे स्वप्न अनेक पिढ्यांनी आपल्या उरी वर्षानुवर्षे एका संकल्पाप्रमाणे जपले आहे, त्या स्वप्नपूर्तीच्या वेळी उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. देवाने मला भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक निमित्तमात्र बनवले आहे.

"निमित्त मात्रम् भव सव्य-साचिन्."

ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या धर्मग्रंथात सुद्धा सांगितले आहे की, देवाच्या यज्ञ आणि उपासनेसाठी आपल्याला स्वतःमध्ये दैवी चैतन्य जागृत करावे लागते. यासाठी धर्मग्रंथात व्रत आणि कडक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन प्राणप्रतिष्ठेपूर्वी करावे लागते. त्यामुळे मला आध्यात्मिक प्रवासातील काही संत-महात्म्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार,त्यांनी सुचवलेल्या यम-नियमांनुसार मी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान मांडत आहे.

या पावन प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो... ऋषी, मुनी आणि तपस्वी यांचे पुण्यस्मरण करतो... आणि भगवंताचे रूप असलेल्या जनता जनार्दनाकडे मी प्रार्थना करतो की, मला आशीर्वाद द्यावा जेणेकरून काया, वाचा, मनाने माझ्याकडून कोणतीही उणीव राहणार नाही. 

 

मित्रांनो

नाशिक धाम-पंचवटी येथून माझ्या 11 दिवसीय अनुष्ठानाची सुरुवात होत आहे हे माझे भाग्य आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीराम बराच काळ वास्तव्यास होते. 

आज माझ्यासाठी सुखद योगायोग आहे की आज स्वामी विवेकानंदजींची जयंती आहे. स्वामी विवेकानंदजींनीच हजारो वर्षांपासून आक्रमणे झेलणाऱ्या भारताची चेतना जागृत केली होती. आज तोच आत्मविश्वास भव्य राम मंदिराच्या रूपाने आपली ओळख म्हणून सर्वांसमोर ठाकला आहे.

आणि अत्यानंदाची बाब म्हणजे, आज माता जिजाबाईंची जयंती आहे. माता जिजाबाई ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एका महामानवाला जन्म दिला. आज आपण आपला भारत ज्या अखंड रूपात पाहत आहोत त्यामध्ये माता जिजाबाई यांचे खूप मोठे योगदान आहे.

आणि मित्रांनो,

जेव्हा मी माता जिजाबाईंचे पुण्यस्मरण करतो तेव्हा मला माझ्या आईची आठवण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. माझी आई अखेरपर्यंत जपमाळ ओढताना सीता-रामाचे नामस्मरण करत असे.

मित्रांनो, 

प्राणप्रतिष्ठेचा मंगल  मुहूर्त...

चराचर सृष्टीचा तो चैतन्यमय  क्षण...

अध्यात्मिक अनुभूतीची ती संधी...

गाभाऱ्यात त्या क्षणी सर्व सामावले असेल  ...!!!

मित्रांनो,

कायारूपाने मी त्या पवित्र क्षणाचा साक्षीदार होईनच, पण माझ्या मनात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात, 140 कोटी भारतीय माझ्या सोबत असतील. आपण माझ्यासोबत असाल… प्रत्येक राम भक्त माझ्यासोबत असेल आणि तो चैतन्यदायी  क्षण आपल्या सर्वांसाठी एक सामायिक अनुभूती  असेल. राममंदिरासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा असंख्य व्यक्तींची प्रेरणा मी माझ्यासोबत नेईन.

त्यागाच्या आणि तपश्चर्येच्या त्या मूर्ती...

500 वर्षांचा संयम...

प्रदीर्घ संयमाचा तो काळ...

त्याग आणि तपश्चर्येच्या अगणित घटना...

दानशूरांच्या… समर्पण करणाऱ्यांच्या कथा.....

असे अनेक लोक आहेत ज्यांची नावेही अनभिज्ञ आहेत, पण ज्यांच्या आयुष्यातील एकमेव ध्येय म्हणजे भव्य राम मंदिर उभारणे. अशा असंख्य लोकांच्या आठवणी माझ्या सोबत असतील.

जेव्हा 140 कोटी देशवासीय त्या क्षणी माझ्याशी मनाने जोडले जातील आणि जेव्हा मी तुमची ऊर्जा सोबत घेऊन गाभाऱ्यात  प्रवेश करेन, तेव्हा मलाही वाटेल की मी एकटा नव्हे तर तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात.

मित्रांनो, हे 11 दिवस वैयक्तिकरित्या माझ्यासाठी यम-नियम असलेले आहेतच मात्र  तुम्ही सर्व माझ्या भावविश्वात सामावलेले आहात. तुम्ही सुद्धा माझ्याशी मनापासून जोडलेले राहा अशी प्रार्थना मी  करतो.

माझ्या अंतःकरणात उमटणाऱ्या भावनांप्रमाणेच रामललाच्या चरणी मी तुमच्या भावना अर्पण करेन. 

मित्रांनो,

ईश्वर निराकार आहे हे सत्य आपणा सर्वांना माहीत आहे. पण ईश्वर, भौतिक स्वरूपातही, आपला आध्यात्मिक प्रवासाला बळ देतो.लोकांमध्ये देव वसतो हे मी व्यक्तिश: पाहिले आणि अनुभवले आहे. पण तीच माणसे जेव्हा भगवंताच्या रूपात आपल्या भावना शब्दात व्यक्त करतात आणि आशीर्वाद देतात तेव्हा माझ्यातही नवी ऊर्जा संचारते. आज मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या भावना शब्दात, लेखी स्वरूपात जरूर व्यक्त करा आणि मला नक्की आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी शब्द नसून मंत्र आहे. मंत्राचे सामर्थ्य म्हणून तो नक्कीच काम करेल. नमो अॅपद्वारे तुम्ही तुमचे विचार, तुमच्या भावना मला थेट पाठवू शकता.

चला,

आपण सर्व प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊया. याच भावनेतून मी तुम्हा सर्व राम भक्तांना कोटी-कोटी नमन करतो.

जय सियाराम

जय सियाराम

जय सियाराम

****

Nilima C/Vasanti/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995451) Visitor Counter : 111