माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकार जेव्हा लोकांच्या दारी येते तेव्हा खरी लोकशाही साकारते : अनुराग सिंह ठाकूर


विकसित भारत संकल्प यात्रेने महत्वाचा टप्पा गाठला असून बारा कोटींहून अधिक लोकांपर्यंत यात्रा पोहोचली आहे : अनुराग सिंह ठाकूर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईतील भायखळा येथे विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅनला दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 11 JAN 2024 4:48PM by PIB Mumbai

मुंबई, 11 जानेवारी 2024


केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच  युवा व्यवहार व  क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुंबईत भायखळा येथे विकसित भारत संकल्प यात्रा व्हॅनला हिरवा झेंडा दाखवला. विकसित भारत  संकल्प यात्रेसाठी उपस्थित  आणि यात्रेचा  भाग झाल्याबद्दल  उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार मानले.

“देशाच्या कानाकोपऱ्यात यात्रा भेट देत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेत  बारा कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. याद्वारे  त्यांना योजनांची माहिती मिळाली आहे आणि केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळाला आहे,” असे सांगून ठाकूर यांनी यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

विकसित  भारत संकल्प यात्रा दोन लाखांहून अधिक पंचायती आणि चार हजारांहून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  या यात्रेचा उद्देश दुर्बल घटकांपर्यंत आणि सरकारी योजनांच्या  लाभांसाठी पात्र असलेल्या लोकांपर्यंत  पोहोचणे आणि त्यांना सरकारी योजनांची ओळख करून देणे हा आहे. विविध योजनांमध्ये लोकांची नोंदणी करून घेण्यासाठी यात्रेअंतर्गत स्टॉल्स असून विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी पत्रके आणि इतर सामग्री उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  

या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, सरकार लोकांच्या दारी पोहोचते, तेव्हा  खरी लोकशाही साकारते  आणि विकसित भारत संकल्प यात्रेत हीच गोष्ट घडत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी आणि स्टॉलच्या माध्यमातून सरकारी योजनांसाठी नावनोंदणी करणे खूप सोपे झाले आहे. नागरिकांना माहिती देणे आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे, हे सरकारचे काम आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय हेच काम करते. माहिती पुस्तिका आणि पत्रके विविध योजनांची माहिती देत आहेत, तर दिनदर्शिका नवीन संसद भवन, भारत मंडपम आणि कर्तव्यपथ यासारख्या नव्या वास्तूंच्या छायाचित्रांमधून, नव्या भारताचा चेहरा अभिमानाने प्रदर्शित करत आहे.

अलीकडच्या काळातील सरकारच्या प्रयत्नाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, सरकारने आपल्या कामकाजात आणि लोक कल्याणकारी योजनांच्या वितरणामध्ये अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणली  आहे. आरएनआय नोंदणी प्रणाली  डिजीटल करण्यात आली आहे आणि चित्रपट प्रमाणीकरणही ऑनलाइन करण्यात आले आहे. डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. जगभरातील डिजिटल पेमेंट (व्यवहार) पैकी चाळीस टक्के पेमेंट आज भारतात होतात. छोटे व्यापारी आणि रस्त्यावरचे विक्रेतेही डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.  

शासनाचे कल्याणाचे तत्वज्ञान स्पष्ट करताना मंत्री म्हणाले की, कोणत्याही भेदभावाशिवाय शासन योजनांचा लाभ देते. ते "सबका साथ, सबका विकास" या मंत्राचे पालन करत आहे.

उपस्थितांना भारताच्या विकास कथेचा एक भाग होण्याचे आवाहन करत ठाकूर म्हणाले, “आपल्याला 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे. हे सहजसाध्य करण्यासाठी माय भारत पोर्टलशी सर्वांनी संलग्न होण्याचे मी आवाहन करतो. यावर तुम्ही स्वयंसेवक बनून विविध गोष्टी शिकू शकता आणि अनुभवू शकता. आज दीड महिन्यापेक्षा कमी कालावधीत एक कोटीहून अधिक लोक माय भारत अॅपशी जोडले गेले आहेत आणि ते देशाच्या प्रगतीसाठी सज्ज आहेत. उद्या पंतप्रधान नाशिकमधून राष्ट्रीय युवा दिनाचे उद्घाटन करतील आणि आपल्या आयुष्यातील पुढील पंचवीस वर्षे विकसित राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या तरुणांना संबोधित करतील. महाराष्ट्रातील नवीन आणि महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. सरकारने केलेली सर्व चांगली कामे तुमच्या सारख्या जागरूक नागरिकांमार्फत समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचत आहेत ज्याद्वारे गरीब आणि गरजूंपर्यंत त्याचा लाभ पोहोचू शकतो हे लक्षणीय आहे. विकसित भारत संकल्प यात्रा बारा कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली हा एक मैलाचा दगड आहे. 26 जानेवारीपर्यंत आपण अठरा कोटींचा टप्पा पार करू. विकसित भारताचा संदेश घेऊन सरकार जनतेच्या दारात येण्याची बहुधा स्वतंत्र भारतातली ही पहिलीच वेळ आहे.”

महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा, भायखळा विधानसभा आमदार यामिनी जाधव आणि आमदार आशिष शेलार हेही यावेळी उपस्थित होते.

 

NC/ST/Sonali/Rajashree/Vasanti/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 
 

 

 


(Release ID: 1995211) अभ्यागत कक्ष : 162