भूविज्ञान मंत्रालय
43 व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेवर असलेले एमव्ही वॅसिली गोलोव्हिन हे जहाज अंटार्क्टिक समुद्रात दाखल
Posted On:
06 JAN 2024 4:12PM by PIB Mumbai
43 व्या भारतीय अंटार्क्टिक वैज्ञानिक मोहीम (आयएसईए) अंतर्गत एमव्ही वॅसिली गोलोव्हिन, या भारताच्या जहाजाने 23 डिसेंबर 2023 रोजी पहाटे केपटाऊन ते अंटार्क्टिका असा प्रवास सुरू केला होता. या मोहिमेत भारताच्या 21 तर बांगलादेशातील एक आणि मॉरिशसच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. या जहाजाला एक एयरोस्पेशियल 350 B3 आणि एक कामोव्ह 32 अशा दोन हेलिकॉप्टरद्वारे हवाई मदतीची सोय करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) च्या अंटार्क्टिक मोहीम चमूचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ योगेश रे यांच्या नेतृत्वाखाली एकूण नऊ सदस्यांचा गट ही जबाबदारी सांभाळत आहे. व्लादिवोस्तोक येथील एम/एस फेस्को मधील 42 क्रू सदस्यांच्या चमूद्वारे या प्रवासावर देखरेख केली जात आहे.
बांगलादेश आणि मॉरिशसमधील सदस्यांना या मोहीमेत सहभागी करून घेणे हा भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा एक भाग असून याद्वारे कोलंबो सुरक्षा परिषद सदस्य तसेच 2023 मध्ये मंत्रालयाने नियोजित केलेल्या निरीक्षक राष्ट्रांमधील शास्त्रज्ञांना अनोखी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बहुपक्षीय मंच कोलंबो सुरक्षा परिषद अंतर्गत 'आमचे भविष्य आमच्या महासागरांसोबत' या संकल्पनेवर आधारित पहिली समुद्रशास्त्रज्ञ आणि हायड्रोग्राफर्स परिषद आयोजित करण्यात आली होती. हे सहभागी प्रवासी मोहिमेचा भाग होण्यासाठी उत्सुक असून अंटार्क्टिका प्रवासात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.
या जहाजात भारतीय मोहिमेसाठी आवश्यक सामग्रीसह प्रिन्सेस एलिझाबेथ स्टेशन, बेल्जियम (बेलारे) आणि प्रोग्रेस स्टेशनसाठीची रसद तसेच दक्षिण आफ्रिकेतील एम/एस अल्टिमा अंटार्क्टिक लॉजिस्टिक्स द्वारे संचालित नोव्हो विमानतळासाठी माल भरलेला आहे. भारतीय मालवाहू जहाजात दोन टप्प्यात माल भरण्यात आला आहे : पहिल्या टप्प्यात 20 ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान मुरगावच्या बंदर भेटीत आणि दुसऱ्या टप्प्यात 15 ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान केपटाऊन येथे हा माल या जहाजावर चढवण्यात आला. गोव्यात या जहाजावर कंटेनरमध्ये भरलेला सर्व माल, कंटेनरमध्ये भरलेले लिव्हिंग मॉड्यूल्स, अवजड यंत्रसामग्री , ब्रेकबल्क स्पेअर्स आणि जहाजाचे इंधन जहाजावर चढवण्यात आले. तर, केप टाउनमध्ये, स्टेशन इंधन टाकी कंटेनर, विशेष रीफर्स कंटेनर, ताजा साठा, सीएचपी वाहनांचे सुटे भाग, जहाजासाठी अतिरिक्त इंधन तसेच हेलिकॉप्टर या जहाजावर चढवण्यात आले.
मोहीमेच्या या हंगामासाठी, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी अनुक्रमे गोवा आणि केपटाऊन बंदरांवर या जहाजात इंधन भरले होते. केपटाऊन येथे प्रथमच भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाद्वारे इंधन भरण्याचे काम हाती घेण्यात आले. एचपीसीएल एव्हीऐशन च्या धोरणात्मक व्यवसाय युनिटने (SBU) एचपीसीएल मध्यपूर्व फोरसाईट ग्रुप सर्व्हिस लिमिटेड (FZCO) मार्फत केपटाऊन येथे आवश्यक इंधन पुरवठा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राचे संचालक डॉ. थंबन मेलोथ यांनी या जहाजाला गोव्यातील आणि केपटाऊनमध्ये भेंट दिली. केपटाऊन मधील भारताचे महावाणिज्य दूत पी. एस. गंगाधर यांनी भारतीय अंटार्क्टिक ऑपरेशन्स पोर्ट कॉल उपक्रमांची माहिती घेण्यासाठी या जहाजाला भेट दिली.
या जहाजाच्या समुद्रप्रवासात त्याला पहिला हिमखंड 53°24' दक्षिण आणि 77°10' पूर्वेकडे दिसला होता. जहाजाने 3 जानेवारी 2024 रोजी 17:55 समन्वित सार्वत्रिक वेळ (UTC) वाजता अंटार्क्टिक समुद्रात प्रवेश केला.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993828)
Visitor Counter : 148