संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागाला दिली भेट
नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थितीचा घेतला आढावा
सैन्य दलांनी अधिक सतर्क राहावे आणि दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता बाळगावी: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन
Posted On:
27 DEC 2023 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 डिसेंबर 2023 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागाला भेट दिली आणि त्यांनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी या भागातील सद्यःस्थिती आणि दहशतवाद विरोधी अभियान , यांचे प्रत्यक्ष मुल्यांकन केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षेविषयी सध्याची परिस्थिती, घुसखोरी विरोधी अभियान आणि परिचालन सज्जता या गोष्टींची तपशीलवार माहिती देण्यात आली.दहशतवाद विरोधी कारवाया राबवताना येणाऱ्या आव्हानांशी संबंधित पैलूंवर राजनाथ सिंह यांनी क्षेत्रीय कमांडर्स बरोबर चर्चा केली. लष्करी कारवाईमध्ये व्यावसायिकता आणि योग्य कारवाई करण्याची सूचना केली.
सैनिकांशी संवाद साधताना, संरक्षण मंत्र्यांनी दहशतवाद विरोधी कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि या शूर वीरांच्या कुटुंबियां प्रति सह वेदना व्यक्त केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जात आहेत यावर भर देत, त्यांनी जखमी सैनिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
सरकार सेना दलाच्या पाठीशी आहे , असे आश्वस्त करत राजनाथ सिंह यांनी सैनिकांचे अतुलनीय शौर्य आणि बलिदानासाठी देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असे सांगितले. सशस्त्र दलांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून, सुरक्षा आणि गुप्तचर चौकट अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, यावर त्यांनी भर दिला.
“भारतीय लष्कर हे सर्वसामान्य सैन्य नाही. सैनिक आमचे रक्षक आहेत. केवळ देशाचे हित जपणे नव्हे, तर लोकांची मने जिंकणे हे त्यांचे कर्तव्य आहे.” संरक्षण मंत्री म्हणाले. दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता असायला हवी, असा पुनरुच्चार करत भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जवानांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या भागातील अलीकडची घटना दुर्दैवी असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले आणि सर्व श्रेणींच्या दलांनी विशिष्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रस्थापित कार्यपद्धतींनुसार गुप्तचर माहितीवर आधारित कारवाई हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. सुस्थापित एसओपी उल्लंघन झाले, तर सर्व कमांडर्सनी शून्य सहनशीलता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी पूंछ जिल्ह्यात बुफलियाज मधील टोपा पीर गावातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. या घटनेचा जलद तपास करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1991061)
Visitor Counter : 129