कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कठुआ येथे आयोजित, 'कार्यस्थळी महिला' या विषयावरील परिसंवादात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे संबोधन
Posted On:
23 DEC 2023 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 डिसेंबर 2023
भारतीय महिला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक व्यवसायात, दीर्घकाळ चालत आलेली केवळ सहभागाची भूमिका न वठवता, नेतृत्व करत आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय-कार्मिक-सार्वजनिक तक्रारी-निवृत्तीवेतन-अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, हे भारताच्या चांद्रयान मोहिमेला त्यांच्या योगदानामुळे मिळालेल्या सामर्थ्यावरुन सिद्ध होते, असेही ते म्हणाले.
'कार्यस्थळी महिला: समस्या आणि आव्हाने', या विषयावर आज कठुआ येथील शासकीय पदवी महाविद्यालयात आयोजित परिसंवादात, डॉ जितेंद्र सिंह बोलत होते. युवा वर्गाने, सरकारने पुरवलेल्या पोषक वातावरणाचा लाभ घेण्याचे आवाहन करून, आपापल्या महत्वाकांक्षांनुसार उंच भरारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांना आपापल्या योग्यतेनुसार विषय निवडणे शक्य करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (एनईपी), त्यांनी या संदर्भात उल्लेख केला. आजची तरुणाई आपल्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ जगत असल्याचे सांगत, तंत्रज्ञानाचा विवेकबुद्धीने योग्य उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की तंत्रज्ञान हे सर्व स्तरांवर उत्कृष्ट समतोल साधणारे म्हणून सिद्ध झाले आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे तंत्रज्ञान अंतर्भूत असून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध आहे.
2047 सालापर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याचे आवाहन देखील, मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले आणि सरकारने आपल्या तरुणाईची क्षमतावृद्धी करण्याची जबाबदारी घेतली आहे, अशी पुस्ती जोडली. ते म्हणाले की 2047 सालचा भारत, सर्वार्थाने पात्र असलेल्या आपल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला असेल याची काळजी घेण्याची जबाबदारी आता या तरुणाईवर आहे.
जग भारताचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे आणि भारत आपल्या महिलांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, असेही डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
स्वतःसाठी उपजीविका मिळवणे आणि इतरांना रोजगार पुरवणे या हेतूने स्वतःचे नवंउद्योग (स्टार्टअप्स) उभारण्यासाठी, पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत पुरवल्या जाणार्या आर्थिक सहाय्याचा लाभ घ्यावा असे आवाहन, डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी युवा वर्गाला केले.
तत्पूर्वी, मंत्रीमहोदयांनी पंतप्रधान आयुष्मान भारतसह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. पीएम आयुष्मान भारत योजनेच्या महिला लाभार्थींनी, अनेक आजारांवर गरीबीमुळे परवडू न शकणारे उपचार, त्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल, सरकारचे आभार मानले.
M.Pange/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1989979)
Visitor Counter : 96