अर्थ मंत्रालय

पायाभूत सुविधा क्षमता-विकासामधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी जागतिक बँक आणि आर्थिक व्यवहार विभागाने पीपीपी बिगिनर्स ई-कोर्सचा केला शुभारंभ

Posted On: 22 DEC 2023 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023

 

पायाभूत सुविधा क्षमता-विकासामधील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाउल म्हणून, जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष अजय बंगा यांनी, 20 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत बिगिनर्स ई-कोर्सचा  (प्रशिक्षणार्थी ई-अभ्यासक्रम) शुभारंभ केला. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या  आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, आणि जागतिक बँक समूहाचे कार्यकारी संचालक  परमेश्वरन अय्यर, यावेळी उपस्थित होते.

पीपीपी ई-कोर्स हा पायाभूत सुविधा-केंद्रित क्षमता-विकास कार्यक्रम असून, तो पायाभूत सुविधा अर्थ सचिवालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे.

भारतातील पीपीपी च्या गतिशील क्षेत्राला समजून घेण्यासाठी आणि त्यासाठी योगदान द्यायला  उत्सुक असलेल्या व्यक्तींना मूलभूत ज्ञान आणि दृष्टीकोन प्रदान करणे, हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.

पायाभूत सुविधा आर्थिक विकासाला चालना देत असून, सरकारसाठी लक्ष केंद्रित करण्याचे ते एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. पायाभूत सुविधा विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. पीपीपी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे यशस्वी वितरण आणि इतर पायाभूत सुविधा उपक्रमांचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल सुनिश्चित करण्यासाठी मजबूत क्षमता विकास आवश्यक आहे. पायाभूत सुविधा विकासातील बहुविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, प्रशिक्षणाच्या प्रयत्नांच्या आवश्यकतेवर भर देत,  सातत्त्याने शिकण्याची आणि आत्मसात करण्याची प्रक्रिया महत्वाची आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी 7 तास 15 मिनिटे आहे, पण  तो स्वत: च्या गतीच्या दृष्टीने तयार केला आहे. हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पीपीपीचा कोणताही पूर्वानुभव आवश्यक नाही.

पीपीपी बिगिनर ई-कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये:

1. सहज उपलब्ध प्रशिक्षण:

  • ऑनलाइन माध्यमात उपलब्ध असलेला हा प्रशिक्षण अभ्यासक्रम देशभरातील मोठ्या जनसमुदायाचा प्रवेश सुनिश्चित करतो.
  • स्व- गती मॉड्यूल, विविध प्रशिक्षण प्राधान्य क्रम आणि वेळापत्रकांना सामावून घेतात.

2. तज्ञ-संचालित सामग्री:

  • उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि धोरण निर्मात्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची सामग्री पीपीपीमधील प्रचलित पद्धती आणि सर्वोत्तम पद्धती प्रतिबिंबित करते.
  • वास्तविक-जगातील केस स्टडी यशस्वी पीपीपी मॉडेल्सचा व्यावहारिक दृष्टीकोन प्रदान करतात.

3. परस्परसंवादी शिक्षण:

  • मल्टीमीडिया घटक, प्रश्नमंजुषा आणि चर्चासत्र परस्परसंवादी शिक्षणाच्या अनुभवला चालना देतात.

4. प्रमाणीकरण:

  • ई-अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थींना पीपीपी मूलभूत तत्त्वांमधील त्यांचे प्राविण्य ओळखणारे प्रमाणपत्र मिळेल.

हा पीपीपी बिगिनर्स ई-कोर्स पुढील वेबसाइटवर उपलब्ध आहे:

https://dea.lms.gov.in/default_new.aspx?clientid=270.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1989758) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu