ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनच्या बचत गटांच्या कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचा रिलायन्स रिटेल जियोमार्टसोबत सामंजस्य करार

Posted On: 22 DEC 2023 9:32PM by PIB Mumbai


नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023


दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनच्या बचत गटांची  उत्पादने जास्तीत जास्त बाजारापर्यंत पोहोचावीत  आणि त्यायोगे ग्रामीण बचतगटाच्या कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने रिलायन्स रिटेलच्या जियोमार्टसोबत सामंजस्य करार केला आहे.

यावेळी बोलताना ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजित सिंह म्हणाले की या सहकार्यामुळे बचतगटांना जियोमार्टच्या ई कॉमर्सवर उत्पादन विक्रेते म्हणून  प्रवेश करता येईल आणि या उपक्रमामुळे सरस कलेक्शन अंतर्गत बचत गटांची उत्पादने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रयत्नांना चालना मिळेल. या भागीदारीमुळे महिला बचत गटांना मोठी बाजारपेठ आणि दृष्टीकोन प्राप्त होईल आणि त्यांना जियोमार्टच्या देशभरातील ग्राहकांना त्यांची विशेष उत्पादने उपलब्ध करून देता येतील. ग्रामीण विकास मंत्रालय आणि जियोमार्ट यांच्या भागीदारीचा एक भाग म्हणून या मंचावर दाखल झाल्यानंतर दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित असलेल्या बचत गटांच्या विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचा ऑनलाईन विस्तार करण्यामध्ये लाभ आणि मार्गदर्शन उपलब्ध होईल.     

सिंह पुढे म्हणाले की ग्रामीण विकास मंत्रालय आणि जियोमार्ट यांच्या या भागीदारीमुळे बचत गटांच्या भगिनींच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भर पडेल. शाश्वत तत्वावर बचत गटांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अभियान कार्यरत आहे आणि या पावलामुळे आमच्या उपक्रमांमध्ये आणखी भर पडेल, असे त्यांनी सांगितले.  

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा यांनी सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. महिला बचत गटांच्या रोजगार संधींमध्ये वाढ करण्यासाठी त्यांना आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे आणि जियोमार्टसोबतच्या या भागीदारीमुळे या दिशेने पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या भागीदारीबाबत बोलताना रिलायन्स रिटेल लिमिटेडचे सार्वजनिक धोरण आणि नियामक प्रमुख आणि अध्यक्ष डॉ. रवी प्रकाश  गांधी म्हणाले की ग्रामीण विकास मंत्रालयासोबत भागीदारी करणे हे आमचे पहिले पाऊल आहे आणि भविष्यात अशाच प्रकारच्या अनेक फलदायक भागीदाऱ्या होतील.

जियोमार्ट देखील त्यांना त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी, दिशादर्शनासाठी आणि बाजारामध्ये त्यांचे स्थान निर्माण करण्यासाठी मदत करेल.त्या व्यतिरिक्त या पोर्टलवर विक्री करण्याच्या अनुभवाबाबत परिचित करून देण्यासाठी जियोमार्ट ग्रामीण मंत्रालयाकडून आयोजित होणाऱ्या प्रशिक्षण आणि कार्यशाळांमध्ये संयुक्त सहभाग घेईल. त्याबरोबरच शाश्वत वृद्धी आणि व्यापार स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी जियोमार्ट या विक्रेत्यांना बाजारात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उद्घाटन पश्चात प्रशिक्षण आणि पाठबळ देईल आणि तसेच या मंचावर विक्री विषयक प्रोत्साहन देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेईल.  

या भागीदारीमुळे ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या सरस कलेक्शन ब्रँड अंतर्गत बचत गट  जियोमार्टवर आणले जातील आणि त्यामुळे पारंपरिक वस्त्रप्रावरणांपासून ते गृह सजावट आणि सौदर्य उत्पादनांपर्यंत  हातमाग आणि हस्त कलाकृतीविषयक उत्पादने या मंचावर उपलब्ध होतील.  

जियोमार्ट विषयी

जियोमार्ट या रिलायन्स रिटेलच्या ई-टेल शाखेने 2020 मध्ये या क्षेत्रात पदार्पण केले. भारतातील सर्वात मोठ्या देशी ई- बाजारपेठांपैकी एक असलेल्या या मंचावर जियोमार्ट लघु आणि मध्यम उद्योजकांचे सक्षमीकरण करत आहे आणि त्यांना संधी उपलब्ध करून देत आहे.


N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1989748) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu