कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरिक-केंद्रित प्रशासन,निर्णय प्रक्रियेतील नागरिकांच्या वाढत्या भूमिकेमधून विकसित होईल असे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 22 DEC 2023 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023

 
नागरिक-केंद्रित प्रशासन, निर्णय प्रक्रियेतील नागरिकांच्या वाढत्या भूमिकेमधून विकसित होईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले.

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकाभिमुख हे प्रशासन प्रारूपाचे वैशिष्ट्य बनले आहे, असे ते म्हणाले.

“कप्याकप्यात स्वतंत्र काम करण्याचे युग संपले आहे. नागरिकांना अखंड सेवा पुरवण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत आहे. क्षमता विकास कार्यक्रम आम्हाला त्यासाठी तयार रहायला सक्षम करतात,” ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज नवी दिल्ली येथे भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्थेने आयोजित केलेल्या डॉ राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय अधिवेशन III (स्मृती व्याख्यान मालिका) मध्ये, 'जी20 जनकेंद्री प्रशासन आणि सार्वजनिक धोरण' या विषयावर बोलत होते.

जानेवारी महिन्यातील भारताच्या लस यशोगाथेने सुरुवात करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ष संपायला केवळ एक आठवडा शिल्लक असून, सरते वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिक केंद्रित प्रशासन मॉडेलचे साक्षीदार ठरले.

“आतापर्यंत कोणीच पोहोचले नाही, त्या चंद्राच्या दक्षिण धृवीय प्रदेशात चांद्रयान-3 च्या अलगद अवतरणाने अवकाश क्षेत्रातील सामर्थ्यवान म्हणून भारताची प्रतिष्ठा सुस्थापित झाली आहे.” ते म्हणाले.

जगातील अव्वल देशांच्या समुहात भारताने आपले स्थान निश्चित केल्यामुळे हे वर्ष खूप लाभदायक ठरले आहे, असे सांगून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, ओपिनियन पोल्सच्या मालिकेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेते म्हणून उदयाला आल्याचे पुन्हा दाखवले आहे.

“यंदाच्या वर्षातील भव्य G20 परिषद आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे आयोजन, यामधून भारताने आपले महत्वाकांक्षी उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रभावीपणे प्रस्थापित केले, ही गोष्ट समाधानकारक आहे,” ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह, जे आयआयपीएचे अध्यक्ष आहेत, म्हणाले की, भारत आज क्वांटम तंत्रज्ञानाचा वापरणाऱ्या जगातील आघाडीच्या पाच ते सहा देशांमधील एक आहे.

“आपले CPGRAMS सार्वजनिक तक्रार पोर्टल, डीबीटी आणि स्वामित्व  कार्यक्रम, याचा तंत्रज्ञानावर आधारित लोककेंद्रित सुधारणा म्हणून जगभरात उल्लेख केला जातो,” असे सांगून ते म्हणाले, “आज जग भारताचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी तयार आहे.”

या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमामि गंगे कार्यक्रमावरील भित्ती दिनदर्शिका आणि टेबलावर ठेवण्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1989720) Visitor Counter : 102


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu