कोळसा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कोळसा मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक संपन्न
यंदाच्या वर्षी देशाचे एकूण कोळसा उत्पादन एक अब्ज टनांच्या पुढे जाण्याची शक्यता: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
Posted On:
22 DEC 2023 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023
भारताचा दरडोई वीज वापर 2030 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता असल्यामुळे, कोळसा उत्पादन आणि त्याच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करून देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय कोळसा, खाण संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ते काल नवी दिल्ली येथे कोळसा मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले की कोळसा मंत्रालयाने अवलंबलेल्या अनेक नवोन्मेशी उपाययोजनांमुळे अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत कोळशाचे उत्पादन आणि उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यंदाच्या वर्षी एकूण कोळसा उत्पादन एक अब्ज टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कोळसा वाहतुकीसाठी, रेकच्या उपलब्धतेमधेही अलीकडे लक्षणीय सुधारणा झाली आहे, ज्यामुळे देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना पुरेसा कोळसा उपलब्ध झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले की, व्यावसायिक/ कॅप्टिव्ह (बंदिस्त) खाणींमधील उत्पादनात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
कोळसा मंत्रालयाने 2020 पासून महसूल वाटा आधारावर लिलाव, लवकर उत्पादन आणि गॅसिफिकेशनसाठी प्रोत्साहन, किमती ठरवण्यासाठी राष्ट्रीय कोळसा आणि लिग्नाइट निर्देशांकाचा समावेश, आगाऊ आणि बीजी रकमेत कपात, ई. यासारख्या अनेक सुधारणा केल्या आहेत. कोळसा उत्पादनासाठी, सुधारित खाण योजना मंजुरी प्रक्रिया, राज्य सरकारांसह भागधारकांसाठी साप्ताहिक आढावा बैठका, प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट (प्रकल्प देखरेख केंद्र) आणि सिंगल विंडो सिस्टमचा (एक खिडकी योजना) परिचय, यासारखी अनेक धोरणे स्वीकारण्यात आली आहेत. कोळसा मंत्रालयाने, रेल्वे मंत्रालयाशी सल्लामसलत करून रेल्वेद्वारे कोळसा वाहतूक क्षमता सुधारली आहे.
देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांची खासदारांनी प्रशंसा केली आणि उपयुक्त सूचना केल्या.
कोळसा उत्पादन आणि वितरणात सुधारणा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सीआयएल/इतर सार्वजनिक कंपन्या आणि खासगी कंपन्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की खाणींमधून कोळसा बाहेर घेऊन जाण्याच्या प्रक्रियेत अजूनही काही आव्हाने असून, रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने अशा आव्हानांचे नियमितपणे निराकरण केले जात आहे. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये औष्णिक कोळशाच्या आयातीवरील अवलंबित्व बंद होऊन, त्याची जागा पूर्णतः देशांतर्गत औष्णिक कोळसा घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि त्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेतल्या जातील, असे आश्वासन दिले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1989694)
Visitor Counter : 103