पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे “विकसित भारत@47: भारताला साहसी पर्यटनाच्या जागतिक केंद्राचे रूप देताना” या विषयावर आधारित साहसी पर्यटनविषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


‘भारतातील साहसी पर्यटनविषयक संकेतस्थळ’ तसेच सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटनस्थळ स्पर्धा 2024’ या उपक्रमांची केली सुरुवात

Posted On: 19 DEC 2023 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गुजरातमधील एकता नगर येथे 18 तसेच 19 डिसेंबर 2023 या कालावधीत “विकसित भारत@47: भारताला साहसी पर्यटनाच्या जागतिक केंद्राचे रूप देताना” या विषयावर आधारित साहसी पर्यटनविषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. भारताला साहसी पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करून या संदर्भातील धोरणे तसेच उपक्रम निश्चित करण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देणे हा या परिषदेच्या आयोजनाचा उद्देश होता.

भारतात असलेली प्राचीन जंगले, हिमाच्छादित हिमालय, पर्वतीय कुरणे, सोनेरी तसेच चंदेरी वाळवंटे, नद्या, तलाव, पाणथळ जागा, कांदळवने, समुद्रकिनारे, ज्वालामुखी आणि प्रवाळ यांच्या रुपातील प्रचंड जैवविविधता ही नैसर्गिक आकर्षणे जगात अतुलनीय आहेत. 

भारताकडे असलेल्या पुढील समृध्द नैसर्गिक आणि पर्यावरण-स्नेही साधनसंपत्तीमुळे लक्षणीय प्रमाणात भौगोलिक फायदा मिळालेला आहे :

  • हिमालयाचा 70% भाग
  • 7,000 किलोमीटर लांब समुद्रकिनारा
  • उष्ण आणि शीत अशा दोन्ही प्रकारचे वाळवंट असलेल्या जगातील तीन देशांपैकी एक देश
  • एकूण वनाच्छादित क्षेत्राच्या बाबतीत जगात 10 व्या क्रमांकाचा देश
  • युनेस्कोने मान्यता दिलेल्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या संख्येच्या बाबतीत जगात 6 व्या क्रमांकाचा देश

नैसर्गिक समृद्धी आणि क्षमता असून देखील भारत जागतिक पातळीवरील साहसी पर्यटनाच्या क्षेत्रात बराच पिछाडीवर आहे. साहसी मनोरंजक उपक्रम आणि खेळ यांच्या क्षेत्रात जागतिक बाजारपेठ होण्याची फार मोठी क्षमता भारतात आहे. जगाच्या विविध भागांतून साहसाच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता भारताकडे आहे. भारताच्या पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण विस्तारातील भौगोलिक परिस्थिती साहसी पर्यटनविषयक संधीच्या विकासाच्या संदर्भात स्पर्धात्मक वातावरण तयार करते.

देशात साहसी पर्यटनाच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने साहसी पर्यटनविषयक राष्ट्रीय धोरण निश्चित केले आहे. तसेच पर्यटन मंत्रालयाला तांत्रिक पाठबळ देण्यासाठीची नोडल संस्था म्हणून भारतीय प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन संस्थेला अधिसूचित करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्याच्या हेतूने, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन सचिवांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय साहसी पर्यटन मंडळाची स्थापना केली असून या मंडळात केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांचा समावेश आहे.

शाश्वत पर्यटन, साहसी पर्यटन आणि पर्यावरण-स्नेही पर्यटन यांच्या विकासासाठी खालील धोरणात्मक स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत:

  1. राज्यांचे मूल्यांकन, वर्गवारी आणि धोरणे
  2. कौशल्ये, क्षमता निर्मिती तसेच प्रमाणीकरण
  3. विपणन आणि जाहिरात
  4. साहसी पर्यटनविषयक सुरक्षा व्यवस्थापन आराखडा बळकट करणे
  5. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील बचाव तसेच संपर्क व्यवस्थेचे जाळे
  6. पर्यटनस्थळ आणि उत्पादन यांचा विकास
  7. प्रशासन आणि संस्थात्मक आराखडा

भारताने वर्ष 2047 पर्यंत 3 ट्रिलीयनची अर्थव्यवस्था होण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट 10 साहसी पर्यटन असलेल्या देशांमध्ये भारताला स्थान मिळून अर्थव्यवस्थेमध्ये 800 अब्ज डॉलर्सचे योगदान साहसी पर्यटनातून मिळण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने या कार्यक्रमात ‘भारतातील साहसी पर्यटनविषयक संकेतस्थळ’ तसेच सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटनस्थळ स्पर्धा 2024’ या उपक्रमांची देखील सुरुवात केली.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1988468) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil