संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हाईस अॅडमिरल दिवंगत बेनॉय रॉय चौधुरी यांना मिळालेले मूळ ‘वीर चक्र’ गांभीर्यपूर्ण कार्यक्रमात, आयएनएस शिवाजी या संस्थेकडे सुपूर्द

Posted On: 19 DEC 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023

 

व्हाईस अॅडमिरल तसेच अतिविशिष्ट सेवा पदक आणि वीर चक्र यांनी सन्मानित दिवंगत बेनॉय रॉय चौधुरी(निवृत्त)यांना मिळालेले ‘वीर चक्र’ लोणावळा येथे काल,18 डिसेंबर 2023 रोजी गांभीर्यपूर्ण कार्यक्रमात, भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रमुख प्रशिक्षण आस्थापनेकडे सुपूर्द करण्यात आले. प्रदीप्त बोस आणि गार्गी बोस या व्हॉईस अॅडमिरल चौधुरी यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून एव्हीएसएम, एनएम, व्हीएसएम, आणि आयएनएस शिवाजी या संस्थेच्या प्रतिष्ठित सागरी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख व्हॉईस अॅडमिरल दिनेश प्रभाकर (निवृत्त) यांनी भारतीय नौदलाच्या वतीने ‘वीर चक्र’ स्वीकारले. ‘वीर चक्र’ हा युद्धभूमीवर, जमीन आकाश आणि समुद्र या ठिकाणी अत्युच्च शौर्याचे दर्शन घडवणाऱ्या सेनानींना देण्यात येणारा भारतीय युद्धकालीन सैनिकी शौर्य पुरस्कार आहे. हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे व्हॉईस अॅडमिरल चौधुरी हे भारतीय नौदलातील एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत.

व्हॉईस अॅडमिरल बेनॉय रॉय चौधुरी यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान मोठ्या शौर्याचे दर्शन घडवले. त्या काळात आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजावर अभियांत्रिकी अधिकारी असलेले व्हॉईस अॅडमिरल चौधुरी यांना युद्धादरम्यानच्या त्यांच्या नेमणुकीच्या काळात असे लक्षात आले की विक्रांत जहाजाच्या एका बॉयलरचे कार्य थांबले असून उर्वरित तीन बॉयलर्स देखील कमी क्षमतेने काम करत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने समुद्रातच अनेक अभिनव दुरुस्त्या केल्या. या संकटकाळात जहाजाच्या साधनांच्या मूळ ब्रिटीश उत्पादकांकडून कोणतीही मदत न घेता, बंदरापासून दूर असताना त्यांनी हे कार्य पार पाडले. त्यांनी केलेल्या दुरुस्ती कार्यात, बॉईलरभोवती पोलादी पट्ट्या बसवणे, अत्यंत धोकादायक स्थितीत सेफ्टी व्हॉल्व्हचे समायोजन करणे, बॉईलर कक्ष रिकामा तरीही दूरस्थ देखरेखीखाली ठेवणे या आणि अशा अनेक तांत्रिक उपाययोजनांचा समावेश होता. या कामात केवळ तंत्रज्ञान अवगत असणे पुरेसे नव्हते तर त्यासोबतच अशा अत्यंत जोखमीच्या कामासाठी सहकाऱ्यांना तयार करण्यासाठी सर्वोच्च नेतृत्वविषयक गुणांची देखील आवश्यकता होती. युद्धादरम्यान व्हॉईस अॅडमिरल चौधुरी यांनी दिलेले योगदान सर्व प्रकारे महत्त्वाचे होते. तत्कालीन नौदल प्रमुख अॅडमिरल एसएम नंदा यांनी चौधुरी यांना ‘अॅन इंजिनियर पार एक्सलन्स’ हा किताब देऊन गौरवले. व्हॉईस अॅडमिरल चौधुरी यांचे शौर्य, देशभक्ती आणि समर्पित सेवा हे त्यांना 1971 च्या युद्धातील धाडसी कार्याबद्दल ‘वीर चक्र’ मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या कार्यांची साक्ष देतात.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988447) Visitor Counter : 268


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi