ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

तांदूळ उद्योग संघटनांनी तांदळाच्या किरकोळ किंमती कमी करण्यात आल्याची तातडीने खात्री करून घेण्याचे केंद्र सरकारचे निर्देश


नफेखोरीचा कोणताही प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचा इशारा

Posted On: 18 DEC 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

बिगर-बासमती तांदळाच्या देशांतर्गत दरांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्ली येथे आघाडीच्या तांदूळ प्रक्रिया उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली.

यंदाच्या खरीप मोसमात तांदळाचे हाती आलेले चांगले पीक, भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) असलेला आणि येऊ घातलेला तांदळाचा मुबलक साठा तसेच तांदूळ निर्यातीसाठी विविध नियमन व्यवस्था असूनही देशांतर्गत तांदळाचे दर वाढत आहेत या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. देशांतर्गत बाजारांमध्ये तांदळाच्या किमती योग्य पातळीपर्यंत कमी होतील याची खात्री तांदूळ उद्योगाने करून घेण्याची गरज व्यक्त करत, नफेखोरीच्या प्रयत्नावर  कडक कारवाईच्या  सूचना देण्यात आल्या.गेल्या दोन वर्षांपासून तांदळाचा वार्षिक महागाई दर 12%च्या आसपास राहिला आहे आणि दर वर्षागणिक तो वाढताना दिसत आहे ही चिंतेची बाब असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

तांदळाच्या कमी केलेल्या दराचा फायदा पुरवठा साखळीत सर्वात शेवटी असलेल्या ग्राहकाला त्वरित मिळायला हवा या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. प्रमुख तांदूळ उद्योग संघटनांनी त्यांच्या सदस्य संस्थांसह हा विषय हाती घ्यावा आणि तांदळाचे किरकोळ दर त्वरित कमी होतील याची सुनिश्चिती करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांना तांदूळ विक्रीमध्ये होत असलेल्या नफ्यात तीव्र वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, किमान किरकोळ किंमत आणि वास्तविक किरकोळ किंमत यामध्ये मोठी तफावत आढळल्यास ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

देशात चांगल्या दर्जाच्या तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून ओएमएसएस अर्थात खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत हा तांदूळ 29 रुपये प्रती किलोच्या राखीव दराने देऊ करण्यात  येत आहे अशी माहिती एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाने दिली आहे. तांदूळ उत्पादक/ व्यापाऱ्यांना एफसीआयकडील साठ्यातून ओएमएसएस अंतर्गत तांदळाची उचल करता येईल  आणि हा तांदूळ वाजवी नफ्यासह ग्राहकांना विकत येईल अशी सूचना देखील या बैठकीत मांडण्यात आली.

केंद्रीय अन्न आणि वितरण विभाग देशातील तांदळाच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवून वेळोवेळी दरांचा आढावा घेत असते आणि रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असणाऱ्या तांदळाच्या किफायतशीरतेची सुनिश्चिती करण्यासाठी गरज पडेल तेथे हस्तक्षेप करत असते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये, भारतीय ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी कमी खर्च येईल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987918) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil