राष्ट्रपती कार्यालय
आयआयटी खरगपूरच्या 69व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी केले संबोधित
Posted On:
18 DEC 2023 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 डिसेंबर 2023) आयआयटी खरगपूरच्या 69 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.
आपल्या आयआयटी व्यवस्थेची जगभरात ख्याती आहे. आयआयटी ही प्रतिभा आणि तंत्रज्ञानाला झळाळी देणारी केंद्रे मानली जातात, असे यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या.
भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीयीकरण आणि आयआयटीच्या जागतिकीकरणाच्या धोरणाच्या अनुषंगाने,आयआयटी खरगपूर इतर जागतिक संस्थांसोबत आघाडी करून आणि सहकार्याने काम करत आहे हे जाणून घेत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. हे पाऊल केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर आयआयटी खरगपूरची ओळख निर्माण करण्यातच मदत करेल असे नाही तर भारतीय शिक्षण व्यवस्थेला जागतिक मान्यता मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल, असे त्या म्हणाल्या
जगातील सर्वात जुनी ज्ञान परंपरा असलेल्या इतक्या विशाल देशातील एकही शैक्षणिक संस्था जगातील सर्वोच्च 50 शैक्षणिक संस्थांमध्ये नाही याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. चांगल्या शिक्षणापेक्षा क्रमवारीची शर्यत महत्त्वाची नाही.मात्र चांगली क्रमवारी केवळ जगभरातील विद्यार्थी आणि चांगल्या शिक्षकांना आकर्षितच करत नाही तर देशाची प्रतिष्ठा देखील वाढवते, असे त्या म्हणाल्या. आयआयटी खरगपूर ही देशातील सर्वात जुनी आयआयटी असल्याने या दिशेने त्यांनी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी नमूद केले.
आयआयटी खरगपूर सारख्या संस्थांना 21वे शतक - नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाद्वारे भारताचे शतक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तंत्रज्ञान विकसित करून ते अंमलात आणण्यासाठी त्यांना क्रांतिकारी प्रयत्न करावे लागतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
तंत्रज्ञानावर प्रत्येकाचा अधिकार असायला हवा. त्याचा उपयोग सामाजिक न्याय आणि समता वाढवण्याच्या आणि समाजातील दरी रुंदावू नये या उद्देशाने व्हायला हवा, असे राष्ट्रपती म्हणाल्या. डिजिटल पेमेंट प्रणाली हे तंत्रज्ञानाने सर्वसामान्यांचे जीवनमान सुलभ करण्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आज भारत नवीन शिखरे गाठत आहे, नवीन मानके स्थापित करत आहे आणि एक मोठी जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. वसुधैव कुटुंबकमच्या भावनेने जगासमोरील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आपण उत्सुक आहोत. भारताच्या या अमृत काळामध्ये तंत्रज्ञानाच्या घुसळणीमुळे सुवर्णकाळ येईल, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987849)
Visitor Counter : 92