माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांनी मुंबई, केरळ, आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विकसित भारत संकल्प यात्रेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना
रोपडमधील घनौला गाव येथील शेकडो विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात नोंदवला सहभाग
Posted On:
16 DEC 2023 8:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला आणि या प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. जनतेबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधण्याच्या या अनोख्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे लाखो लाभार्थी मोठ्या उत्साहाने याप्रसंगी उपस्थित होते. जनतेबरोबर पंतप्रधानांनी संवाद साधणे हा या कार्यक्रमाचा महत्वपूर्ण मैलाचा दगड ठरला. हा संवाद भारतातील नागरिकांच्या जीवनावर सरकारी उपक्रमांचा मूर्त प्रभाव दर्शवतो.
पंतप्रधानांनी देशभरातील पाच ठिकाणी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. या स्थानांमध्ये मुंबई (महाराष्ट्र), आसाम (गुवाहाटी) कोझिकोड (केरळ) शिमला (हिमाचल प्रदेश) आणि लखनौ (उत्तर प्रदेश) यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या लाभार्थ्यांनी अनुकरणीय सशक्तीकरण, रोजगार निर्मिती आणि सन्मानजनक विस्ताराचे उद्दिष्ट साध्य केले असून यातून सरकारी योजनांचा वास्तविक जीवनावरील परिवर्तनात्मक प्रभाव दिसून येत आहे.
रोपर जिल्ह्यातील घनौला गावात हा कार्यक्रम जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शेखावत यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, पीएम उज्वला, आधार नावनोंदणी इत्यादी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्यांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यात कोणीही मागे राहू नये या निर्धाराने भारत सरकारने लोकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, असे ते यावेळी म्हणाले. पूर्वी घनौला गावातील कार्यक्रमापूर्वी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी महोलीमधील बलोंगी गावात SAS नगर येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या ठिकाणी देखील भेट दिली.
पंतप्रधानांनी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमधील विकसित भारत संकल्प यात्रेला दूरदृश्य प्रणालीमार्फत हिरवा झेंडा दाखवला. आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून झारखंडच्या खुंटी येथून 15 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा, सर्व ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना भेट देण्याच्या उद्दिष्टाप्रति लक्षणीय प्रगती करत आहे. माहिती, शिक्षण आणि दळणवळण (IEC) व्हॅनचा उपयोग करून, आणि प्रत्येक ठिकाणी विविध योजनांसंबंधी शिबिरे आयोजित करून, ही यात्रा समग्र आणि सर्वसमावेशक विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देत आहे.
लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा थेट संवाद, विविध योजनांचे लाभ ज्यांना त्यांची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची खात्री करून, नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या सरकारच्या समर्पणाला बळकटी देते. हा उपक्रम सरकारच्या पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिक-केंद्रित प्रशासनाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे.
या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांची परिपूर्णता मिळवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात मार्गक्रमण करत आहे.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987318)
Visitor Counter : 125