संरक्षण मंत्रालय
कॉर्पोरेट क्षेत्राने अनिवार्य बंधनांच्या भावनेतून बाहेर पडत देशाच्या उत्थानासाठी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावे : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन
Posted On:
09 DEC 2023 7:57PM by PIB Mumbai
कॉर्पोरेट क्षेत्राने अनिवार्य बंधनांच्या भावनेतून बाहेर पडत देशाच्या उत्थानासाठी स्वयंस्फूर्तीने योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. मुंबईत आयोजित, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी-सीएसआर उत्कृष्टता पुरस्कार कार्यक्रमात ते आज बोलत होते. स्वयंस्फूर्तीने दिलेले योगदान आणि कायदेशीर बंधनातून केलेली कामे, यांच्यातील फरक त्यांनी अधोरेखित केला आणि लोकांशी अधिकाधिक संबध प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. देशाच्या कल्याणासाठी मनापासून केलेली पाच रुपयांची मदत देखील, लोकांच्या जवळ पोहोचवणारी असते, जे काम, कर म्हणून दिलेल्या 100 रुपयांतूनही साध्य होत नाही, असे त्यांनी सांगितले.
“असा समाज, जिथे लोकांना कोणतेही सामाजिक मूल्य नाही, बांधिलकी नाही, जिथे ते केवळ बंधन म्हणून कायदे पाळतात, तो समाज, राहण्यास योग्य असेल का? असा प्रश्न विचारत, त्यांनी त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही विशद केला. समाजामध्ये, अशा बंधुभावाची सामायिक भावना असायला हवी, जिथे प्रत्येक जण एकमेकांना मदत करण्यास तत्पर असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशाच्या उन्नतीसाठी, इतरांना पुढे येण्यास आणि योगदान देण्यास प्रेरित करण्याच्या गरजेवर भर देत, ज्या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याबद्दल जागरूकता वाढवण्याचे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी केले. कोणत्या प्रकारच्या हस्तक्षेपांमुळे किंवा मदतीमुळे समाजाला फायदा होत आहे आणि होत नाही, त्याबद्दलही माहिती असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सामाजिकदृष्ट्या जागरूक लोकांची, विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना, अशा लोकांचे योगदान लक्षात ठेवणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
जनता असो किंवा सरकार, एक चांगले राष्ट्र निर्माण करणे हे सर्वांचे मूळ उद्दिष्ट असले पाहिजे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. सामाजिक जबाबदारीचे तत्व आणि सरकारी कार्यक्रमांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी केले. संरक्षणमंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला त्यांच्या कंपनीसाठी स्रोतांच्या प्रभावी वापरावर लक्ष केंद्रित करण्याइतकेच सामाजिक जबाबदारीच्या कार्यक्षमतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. सर्वोत्तम जागतिक सीएसआर पद्धती स्वीकारण्यास अजिबात संकोच करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, त्याचवेळी, त्यांनी समाजात फूट पाडणाऱ्या विचारधारांविरुद्ध सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत त्या पूर्णपणे नाकारल्या पाहिजेत असेही सांगितले.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1984645)