संरक्षण मंत्रालय
जागतिक विकासाचे इंजिन म्हणून भारत जगाला एक नवीन दिशा देत आहे: फिक्कीच्या 96 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
09 DEC 2023 2:07PM by PIB Mumbai
जागतिक विकासाचे इंजिन म्हणून भारत उदयास येत असून जगाला नवी दिशा देत आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 09 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) अधिवेशनात आणि 96 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. भारताची विकासगाथा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली एक अब्जापेक्षा जास्त भारतीयांची मेहनत आणि क्षमता याचा परिपाक आहे, असेही ते म्हणाले.
संरक्षण मंत्रांनी यावेळी अधोरेखित केले की सरकारची परिवर्तनकारक धोरणे आणि विविध उपक्रमांनी भारताच्या विकास गाथेला बळकटी दिली असून या उपक्रमांचे विविध पैलू आजच्या विश्वाला आकार देत आहेत. भारताचा विकास कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण ऱ्हास करून केला जाणार नाही यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. आम्ही हरित विकासाचा मार्ग निवडला आहे. आम्ही पॅरिस करारावर स्वाक्षरी केली. आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे. स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. आम्ही कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण देखील कमी केले आहे, असेही ते म्हणाले.
आर्थिक वाढ ही कोणत्याही लैंगिक भेदभावाशिवाय व्हायला हवी यावर भर देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्वीच्या मानसिकतेत यशस्वीरित्या बदल घडून आणला आहे, ज्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या वाढीचे श्रेय केवळ आणि केवळ पुरुषांना आणि पुरुषांच्या योगदानाला दिले होते. “महिलांचे सक्षमीकरण हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही हे सुनिश्चित केले आहे की भारताचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकास केवळ पुरुषांच्या बळावरच नाही तर नारी शक्तीच्या बळावर देखील होईल,” असे ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने उचललेल्या पावलांबाबत बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की “मुली आता सैनिकी शाळांमध्ये शिकत आहेत, महिला अधिकाऱ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. महिलांना आता लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त केले जात आहे, युद्धनौकांवर तैनात केले जात आहे आणि सीमेवरील महत्त्वाच्या सैनिकी तळांवर तैनात केले जात आहे. याशिवाय, अग्निपथ योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण मुली सशस्त्र दलात सामील होत आहेत. सर्वसमावेशक विकासाप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारताच्या विकासाची यशोगाथा हेच दर्शवते की आर्थिक वाढ आणि वितरणातील न्याय यांच्यात कोणताही परस्पर विरोध नाही. प्रत्येकासाठी समान संधी आणि वेगवान विकास दर एकाच वेळी साध्य केला जाऊ शकतो, याचेच दर्शन आपल्या विकासाच्या मॉडेल मधून घडते," असेही ते म्हणाले.
देशाची विकासगाथा टिकवून ठेवण्यासाठी सरकारचा देशातील युवाशक्तीवर विश्वास आणि आत्मविश्वास असल्याचे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. युवक हे देशाचे भविष्य आहेत, जे भारताला विकसित राष्ट्र बनवतील, असे ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्योग जगतातले नेते आणि अर्थव्यवस्थेतील इतर सर्व भागधारकांना 21व्या शतकाला भारताचे शतक बनवण्यासाठी सरकारसोबत आणखी सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
***
M.Pange/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1984577)
Visitor Counter : 85