राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते लक्ष्मीपत सिंघानिया-आयआयएम लखनौ राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कारांचे वितरण
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2023 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, 07 डिसेंबर 2023 रोजी, नवी दिल्ली येथे लक्ष्मीपत सिंघानिया-आयआयएम लखनौ राष्ट्रीय नेतृत्व पुरस्कारांचे वितरण केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठीच्या आंधळ्या शर्यतीमुळे मानवतेचे नुकसान झाले आहे. हवामान बदल तसेच पर्यावरणीय अस्ताव्यस्तता हेही त्याचेच परिणाम आहेत. आज संपूर्ण जग या आव्हानाशी संघर्ष करत आहे. कमाल नफा मिळवणे ही संकल्पना पाश्चात्य संस्कृतीचा भाग असली तरीही या संकल्पनेला भारतीय संस्कृतीमध्ये कधीच प्राधान्य दिले गेले नाही. मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये उद्योजकतेला प्रमुख स्थान देण्यात आले आहे.
आपले युवक स्वयंरोजगाराची संस्कृती स्वीकारत आहेत हे लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.त्या म्हणाल्या की आता भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट अप परिसंस्था झाला आहे.जगातील सर्वोत्तम युनिकॉर्न केंद्रे असलेल्या देशांमध्ये आज भारताची गणना होते.आपल्या देशातील युवकांकडे असलेल्या तांत्रिक ज्ञानासह त्यांची व्यवस्थापन कौशल्ये आणि व्यापारातील आघाडी याचेच हे उदाहरण आहे.जगातील काही आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुखपद भारतातील युवक भूषवत आहेत असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की देशाच्या अधिक परिणामकारक आणि समावेशक विकासासाठी आपल्याला आपल्या व्यवस्थापन शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये काही बदल केले पाहिजेत.भारतीय व्यवस्थापन शिक्षणाला भारतीय कंपन्या, ग्राहक आणि समाजाशी जोडून घेण्याचा आग्रह त्यांनी देशातील व्यवस्थापक, शिक्षणतज्ञ आणि संस्था प्रमुखांकडे व्यक्त केला. त्या म्हणाल्या की परदेशातील व्यापार संस्थांवर आधारलेली उदाहरणे आणि लेख यांचे शिक्षण घेण्यापेक्षा भारतीय तसेच भारतात स्थायिक बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्यावर आधारित उदाहरणे लिहिली आणि शिकवली जायला हवी.आपल्या व्यवस्थापन शिक्षण संस्थांनी भारतात स्थित संशोधन जर्नलमधील विषयांवर आधारित संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.जी भारतीय जर्नल्स सर्वांना वापरासाठी खुली आहेत आणि जी देशाच्या विविध भागांमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विभागातील विद्यार्थी तसेच संशोधक यांना प्राप्त होण्यासारखी आहेत अशा जर्नल्सकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत मुर्मू यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की नुकतेच उत्तराखंडातील सिलक्यारा येथे बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची ज्या पद्धतीने सुटका करण्यात आली त्याची केवळ प्रशंसाच झाली असे नव्हे तर ही घटना नेतृत्वविषयक अभ्यासाच्या संदर्भात देखील चर्चिली गेली. सध्या हा सगळ्यांच्या चर्चेचा अत्यंत उत्तम आणि सजीव विषय आहे, विशेषतः संकटाच्या काळात नेतृत्वगुण आणि संघभावनेने केलेले कार्य यांची जोरात चर्चा होत आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत बोलताना, राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की अनेक लोकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे आपली नोकरी जाईल अशी देखील भीती वाटते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सगळ्या पैलूंना व्यवस्थापन शिक्षणाशी जोडले पाहिजे असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. ज्याला कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाची चांगली जाण आहे आणि जो त्याचा योग्य प्रकारे वापर करतो त्याला कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे नोकरी गमावण्याची भीती कधीच वाटत नाही. आयआयएम लखनौ सारख्या संस्थांनी देखील अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय लक्षात ठेवून त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1983565)
आगंतुक पटल : 137