आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मिथक विरुद्ध तथ्ये
चीनमध्ये नुकत्याच उसळलेल्या न्यूमोनिया प्रकरणांचा संबंध जोडत दिल्लीतील एम्समध्ये बॅक्टेरियाची प्रकरणे आढळल्याचा दावा करणारे माध्यमांचे अहवाल दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत
मायकोप्लाज्मा न्यूमोनिया हे समुदायात पसरणाऱ्या न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जीवाणूजन्य कारण आहे
दिल्लीतील एम्स मधील न्यूमोनिया प्रकरणांचा चीनमधील मुलांमध्ये नुकत्याच झालेल्या श्वसन संसर्गाशी कोणताही संबंध नाही
Posted On:
07 DEC 2023 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 डिसेंबर 2023
एका राष्ट्रीय दैनिकातील अलीकडील बातमीत असा दावा करण्यात आला आहे की एम्स दिल्लीला, चीनमधील न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीशी संबंधित सात जीवाणू प्रकरणे आढळली आहेत. हा वृत्त अहवाल चुकीची माहिती देणारा आणि दिशाभूल करणारा आहे. या सात प्रकरणांचा चीनसह जगाच्या काही भागांतून नोंदवलेल्या मुलांमधील श्वसन संसर्गाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही असे स्पष्ट केले जात आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल ते सप्टेंबर 2023) एम्स दिल्ली येथे सुरू असलेल्या अभ्यासा अंतर्गत ही सात प्रकरणे आढळली असून चिंतेचे कारण नाही. जानेवारी 2023 पासून आजतागायत, आय. सी. एम. आर. च्या बहुविध श्वसन रोगकारकांवरील देखरेखी अंतर्गत एम्स दिल्लीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात चाचणी केलेल्या 611 नमुन्यांमध्ये मायकोप्लाज्मा न्यूमोनिया आढळून आला नाही. यात रिअल-टाइम पी. सी. आर. द्वारे प्रामुख्याने गंभीर तीव्र श्वसन रोगाचा(SARI ज्यामध्ये यापैकी सुमारे 95 टक्के प्रकरणे होती) समावेश होता. मायकोप्लाज्मा न्यूमोनिया हे समुदायात पसरणाऱ्या न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जीवाणूजन्य कारण आहे. अशा सर्व संसर्गांपैकी जवळजवळ 15-30% प्रकरणात हेच कारण आहे. भारताच्या कोणत्याही भागातून अशा प्रकारची वाढ नोंदवली गेलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि दररोज परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983521)
Visitor Counter : 97