आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी केनियाचे अध्यक्ष विल्यम रुतो यांच्यासमवेत केले भारत-केनिया व्यापार आणि गुंतवणूक मंचाला संबोधित
जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात आकारमानाच्या दृष्टीकोनातून जागतिक पुरवठ्यात 20% इतका दमदार वाटा असलेला भारत या क्षेत्रातील एक अग्रणी देश आहे- डॉ. मनसुख मांडविया
Posted On:
05 DEC 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023
जेनेरिक औषधांच्या क्षेत्रात आकारमानाच्या दृष्टीकोनातून जागतिक पुरवठ्यात 20% इतका दमदार वाटा असलेला भारत या क्षेत्रातील एक अग्रणी देश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे. केनियाचे अध्यक्ष डॉ. विल्यम समोई रुतो यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आयोजित केलेल्या भारत-केनिया व्यापार आणि गुंतवणूक मंचाला ते आज संबोधित करत होते. डॉ.रुतो हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.
भारत आणि केनिया यांच्यातील घनिष्ठ आणि मजबूत ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांना अधोरेखित करत डॉ, मांडविया म्हणाले,आपल्या उद्योजकांना परस्परांसोबत व्यवसाय करणे सोपे वाटते. ऐतिहासिक कालखंडापासून निर्माण झालेल्या या विश्वासामुळे अनेक भारतीयांना केनियामध्ये स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी आरोग्यनिगा आणि औषधनिर्मिती या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारताने सर्वाधिक प्रगती केली असल्याचे सांगितले आणि केनियाच्या जनतेला त्याचा लाभ मिळणार असल्यावर भर दिला.
“वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या मंचामुळे जगभरातील परदेशी नागरिकांना भारतात उपचारांची सुविधा मिळेल. भारताच्या किफायतशीर आणि दर्जेदार औषधनिर्मिती आणि आऱोग्यनिगा प्रणालींमुळे केनिया आणि जगभरातील लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने उपचारांची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. या सुविधांमध्ये आणखी वाढ करायला आम्हाला आनंद होईल,” मांडविया म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी डिजिटल अर्थव्यवस्था आणि अपारंपरिक ऊर्जा यांच्यासह भारताने हाती घेतलेल्या इतर उपक्रमांचा उल्लेख केला. दोन्ही देशांच्या परस्पर फायद्यासाठी भारतीय आणि केनियन उद्योजकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या केनियाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आणि आफ्रिकी संघाला जी20 चा स्थायी सदस्य म्हणून समाविष्ट करण्याच्या यशस्वी पाठींब्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी बोलताना डॉ. रुतो म्हणाले की केनियाने भारतासोबत 1911 मध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच संबंध प्रस्थापित केले. केनियन आणि भारतीय म्हणजे दोन वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वसलेले एकाच प्रकारचे लोक आहेत, असे त्यांनी सांगितले.
या देशात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यवसायांना प्रोत्साहित करत डॉ. रुतो म्हणाले, व्यवसाय वाढवण्यासाठी सरकारने एक पोषक वातावरण तयार केले आहे आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आणली आहेत. भारतीय व्यावसायिकांनी केनियामध्ये उत्पादन सुविधा सुरू कराव्यात जेणेकरून त्यांना संपूर्ण आफ्रिकी बाजारपेठ त्याचबरोबर अमेरिकन बाजारपेठ या प्रदेशांसोबतच्या केनियाच्या मुक्त व्यापार करारांमुळे खुली होईल, असे आवाहन त्यांनी केले.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982900)
Visitor Counter : 107