संरक्षण मंत्रालय
बेळगावी इथल्या एअरमेन ट्रेनिंग स्कूलमधील अग्निवीरवायू प्रशिक्षणार्थींचे दीक्षांत संचलन
Posted On:
02 DEC 2023 8:36PM by PIB Mumbai
बेळगावी इथल्या एअरमेन ट्रेनिंग स्कूलमधील अग्निवीरवायू महिला प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या आणि पुरुष प्रशिक्षणार्थींच्या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याबद्दल आज 2 डिसेंबर 2023 रोजी दीक्षांत संचलन झाले. महिला अग्निवीरवायूच्या पहिल्या 153 महिलांच्या तुकडीने पुरुषांच्या तुकडीच्या बरोबरीने आज पथसंचलन केल्याबद्दल भारतीय हवाई दलाच्या इतिहासात या दिवसाची विशेष नोंद होईल. महिला आणि पुरुष अशा एकूण 2280 अग्निवीरवायू प्रशिक्षणार्थींनी 22 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
एअर मार्शल आर. राधीश, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ट्रेनिंग कमांड, भारतीय हवाई दल यांनी पथसंचलनादरम्यान प्रशिक्षणार्थींनी केलेली ड्रिल व मार्च पास्टची प्रात्यक्षिके पाहिली.
प्रशिक्षणादरम्यान विविध विभागांमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या विजेत्या प्रशिक्षणार्थींना एअर मार्शल यांनी पुरस्कार प्रदान केले आणि त्यांचे अभिनंदन केले. जागतिक पातळीवरील बदलत्या परिस्थितीतील नव्या आव्हानांचा उल्लेख करून युद्ध आणि लष्करी सज्जतेबाबत 22 आठवड्यांच्या काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा प्रशिक्षणार्थींनी लष्करी उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी वापर करून घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच, अग्निवीरवायूंनी आपले ज्ञान, कौशल्य आणि सक्षमता सातत्याने वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
अग्निवीरवायूंच्या या तुकड्या हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत 28 जून 2023 रोजी घेण्यात आल्या.
***
N.Chitale/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982023)
Visitor Counter : 85