माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यामधील इफ्फी 54 च्या समारोप समारंभात हिमाचल प्रदेश पोलीस ऑर्केस्ट्राने केले सादरीकरण
गोवा/मुंबई, 29 नोव्हेंबर 2023
हिमाचल प्रदेश पोलीस ऑर्केस्ट्रा (वाद्यवृंद), ‘हार्मनी ऑफ द पाइन्स’ ने 28 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप समारंभात सादरीकरण केले.
या ऑर्केस्ट्राला ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध अभिनेते मायकल डग्लस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उभे राहत दाद दिली.
इफ्फी 54 च्या समारोप समारंभात सादरीकरण करण्याची संधी दिल्याबद्दल या वाद्य वृंदाचे नेतृत्व करणारे इन्स्पेक्टर विजय यांनी, त्यांच्या पथकाच्या वतीने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले.
केवळ सात सदस्यांच्या सहभागाने 1996 मध्ये साधेपणाने सुरुवात झालेला ‘हार्मनी ऑफ द पाइन्स’ हिमाचल प्रदेश पोलीस ऑर्केस्ट्रा हा एक उल्लेखनीय सांगीतिक कार्यक्रम आहे. सुरुवातीला पोलिस दलाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला हा बँड अल्प काळात विविध विभागीय कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करू लागला. हार्मनी ऑफ द पाइन्सने गोव्यामधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी 2023) प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
हिमाचल प्रदेश पोलिस ऑर्केस्ट्राने कलर्स टीव्हीवरील हुनरबाज देश की शान कार्यक्रमाची अंतिम फेरी गाठली असून, त्यांनी व्यापक लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर त्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे सदिच्छादूत म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतीय टपाल तिकिटावर चित्रित करून, गौरव करण्यात आल्यावर, या बँडने प्रसिद्धीचे नवे शिखर गाठले.
2016 मध्ये एका महत्त्वाच्या समारंभात, हिमाचल प्रदेश सरकारने या बँडला अधिकृतपणे मान्यता दिली, आणि "हार्मनी ऑफ द पाइन्स हिमाचल प्रदेश पोलिस ऑर्केस्ट्रा" असे त्याचे नामकरण केले. या ओळखीमुळे तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खाकी गणवेशाचे प्रतिनिधित्व करणारा भारतातील पहिला वाद्यवृंद ठरला.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
(Release ID: 1980967)
Visitor Counter : 150