संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत संरक्षणसामग्रीचा निर्यातदार बनण्यासाठी दर्जेदार निर्मिती संस्कृती निर्माण करावी : डीआरडीओच्या गुणवत्ता परिषदेत संरक्षण मंत्र्यांचा भारतीय संरक्षण उपकरण निर्मात्यांना सल्ला

Posted On: 29 NOV 2023 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2023

भारतातील संरक्षण सामग्री उत्पादकांना , देशात दर्जेदार उत्पादने निर्माण करण्याची संस्कृती विकसित करण्याचे आवाहन करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी ती पूर्वअटच आहे, असे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. डीआरडीओच्या नवी दिल्लीत झालेल्या  गुणवत्ता परिषदेत, संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी गुणवत्तेला महत्त्व या संकल्पनेवर आज, म्हणजेच 29 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांचं प्रमुख भाषण झालं, त्यावेळी ते बोलत होते. केवळ दर्जेदार उत्पादनानांच जागतिक बाजारात मागणी असल्याचे सांगत, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर, जागतिक उत्पादनांचे केंद्र आणि निव्वळ निर्यातदार  होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यात यामुळे मदत मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

जे देश दर्जेदार उत्पादने तयार करतात, त्यांची उपकरणे जगभरातील देशांमध्ये निर्यात केली जातात, असे राजनाथ सिंह यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, चांगल्या दर्जामुळे संरक्षण विषयक उत्पादनांच्या किमती जास्त असतात, मात्र, ही उत्पादने आयात करणारे देश अत्याधुनिक उत्पादनांसाठी जास्तीत जास्त किंमत देण्यास तयार आहेत, हे ही लक्षात घ्यायला हवे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

उच्च दर्जाची उत्पादने देशांतर्गत संरक्षण उद्योगात विश्वासार्हता निर्माण करण्यात मदत करतात,  यावर भर देत राजनाथ सिंह म्हणाले की, अशा उपकरणांचे देशात उत्पादन झाल्यास,  जागतिक मागणी वाढेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिष्ठा वाढेल. दर्जेदार संरक्षण उत्पादनांची निर्मिती करताना खर्च नियंत्रणाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

खर्च नियंत्रणाला अत्यंत महत्त्व द्यायला हवेच; मात्र गुणवत्तेच्या खर्चात कपात करायला नको असं संरक्षणमंत्री म्हणाले. प्रभावी, विश्वासार्ह तसेच सुरक्षित आणि सशस्त्र दलांना मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडू शकतील अशा उच्च दर्जाच्या लष्करी प्रणाली तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी, बोलताना संरक्षण विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी डीआरडीओ, दर्जेदार उत्पादने निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं सांगितलं.

उच्च दर्जाची स्वदेशी प्रणाली, मानके, धोरणे आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी करण्यासाठी देशात एक विशेष व्यवस्था निर्माण करण्यासाठी या परिषदेत सर्व भागधारकांना तज्ञांशी चर्चा करण्याची संधी मिळाली. या परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी ‘आत्मनिर्भर भारत’ साठी भारतातील संरक्षण उत्पादन क्रांतीशी संबंधित, गुणवत्तेच्या विविध पैलूंवर विचारमंथन केले.

 N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1980896) Visitor Counter : 133