माहिती आणि प्रसारण मंत्रालय

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी ) सांगता, चित्रपट आस्वादाचा आनंद कायम राहणार


अब्बास अमिनी यांचा पर्शियन चित्रपट एंडलेस बॉर्डर्स 54 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी

हॉलिवूड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अँथनी चेन यांना 'ड्रिफ्ट' चित्रपटासाठी आयसीएफटी युनेस्को गांधी पदक

'पंचायत' या अमेझॉन मालिकेला सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा (ओटीटी )पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत विविध भाषांमधल्या 5,000 हून अधिक चित्रपटांचे 4 के डिजिटल स्वरूपात पुनर्संचयन केले जाणार : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 28 NOV 2023 8:55PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

 

अरबी समुद्रावर सूर्य मावळत असताना, पणजीच्या नयनरम्य किनाऱ्यावर सोनेरी आठवणींचा ठेवा देत, 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ( इफ्फी) सांगता झाली. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टता आणि मोहकता यांचे दर्शन या महोत्सवात घडले. चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती, चित्रपट निर्माते आणि दिग्गज या  शानदार सांगता सोहळ्याला उपस्थित होते. 

पर्शियन चित्रपट  'एंडलेस बॉर्डर्सला' सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण मयूर पुरस्कार 

अब्बास अमिनी दिग्दर्शित  'एंडलेस बॉर्डर्स'   या पर्शियन चित्रपटाने  54 व्या इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा  सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. या चित्रपटाबाबत परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले,  ''तुम्ही स्वतःवर लादलेल्या भावनिक आणि नैतिक सीमा भौगोलिक  सीमांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या, ओलांडायला कठीण असू शकतात.''

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून  बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह ‘ब्लागाज लेसन्स’या  चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून  बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह ‘ब्लागाज लेसन्स’या  चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले आहे. या चित्रपटाबाबत परीक्षकांनी सांगितले, स्टीफन  कोमांडारेव्ह  एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेद्वारे एक खोलवर ठसा उमटवणारा  आणि धक्कादायक धडा सांगतात. चित्रपटातील व्यक्तिरेखा ब्लाग हिला   तिची ध्येये साध्य करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आणि असे करताना तिच्या मूल्यांशी तडजोड करावी लागते.  चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या एली स्कोर्चेवा आणि रोझाल्या अबगार्यान या  अभिनेत्रींनी  स्टीफन कोमांडारेव्ह  यांच्या वतीने हा  पुरस्कार स्वीकारला.

पौरिया रहिमी सॅम  सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित

इराणी अभिनेते  पौरिया रहिमी सॅम यांची  अब्बास अमिनी दिग्दर्शित पर्शियन चित्रपट एंडलेस बॉर्डर्समधील भूमिकेसाठी सर्वानुमते सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.  परीक्षकांनी सांगितले, "अभिनयाची समृद्धता आणि चित्रीकरणाच्या आव्हानात्मक स्थितीत जोडीदार, मुले आणि प्रौढांसोबत संवाद कौशल्य यासाठी ही निवड करण्यात आली ."

मेलानी थियरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित

फ्रेंच अभिनेत्री, मेलानी थियरी यांना  'पार्टी ऑफ फूल्स' या चित्रपटातील उल्लेखनीय  भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले.  परीक्षक म्हणाले,  ''या चित्रपटात अभिनेत्री आपल्या वेडसर व्यक्तिरेखेच्या सादरीकरणातून  प्रेक्षकांना आशेपासून निराशेपर्यंतच्या सर्व भावनांचे हृद्य दर्शन घडवते.  निर्माती ज्युलिएट ग्रँडमॉन्ट यांनी मेलानिया थियरी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

भारतीय चित्रपटकर्मी ऋषभ शेट्टी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित 

भारतीय चित्रपटकर्मी  ऋषभ शेट्टी यांना  त्यांच्या 'कांतारा' चित्रपटासाठी  विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. अतिशय महत्त्वाच्या विषयावरची  कथा सादर करण्याच्या  दिग्दर्शकाच्या क्षमतेची परीक्षकांनी  प्रशंसा केली. "चित्रपट, स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण  जंगल संस्कृतीतला असून  संस्कृती आणि सामाजिक स्थितीची सीमारेषा ओलांडून  प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो," असे परीक्षकांनी नमूद केले. 

रेगर आझाद काया यांना  सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला

सीरियन अरब रिपब्लिकमधील एक आश्वासक चित्रपट निर्माते असणाऱ्या रेगर आझाद काया यांना त्यांच्या व्हेन द सीडलिंग्ज ग्रो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.  ज्युरींनी उद्धृत केले की हा चित्रपट एक कथा कथन करतो जी आपल्याला एक बाप, मुलगी आणि हरवलेल्या मुलाच्या आयुष्यातील एक दिवस छोट्या छोट्या घटनांमधून उलगडून दाखवण्यात यशस्वी होते.

अँथनी चेनच्या ड्रिफ्टने आयसीएफटी- युनेस्को गांधी पदक पटकावले

फ्रेंच, ब्रिटिश आणि ग्रीक सह-निर्मिती असलेल्या अँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्टला प्रतिष्ठित आयसीएफटी- युनेस्को  गांधी पदक मिळाले.  जीवनातील अनिश्चिततेतून वाहून जात असताना अनपेक्षित बंध कसे निर्माण होऊ शकतात याचे चित्रण करणारा हा चित्रपट आशा आणि लवचिकतेच्या रेषा रेखाटतो असे निरीक्षण निवड ज्युरींनी नोंदवले आहे.

‘पंचायत सीझन २’ ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ( ओटीटी) पुरस्कार

दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित पंचायत सीझन 2 ला सर्वोत्कृष्ट वेब मालिका ( ओटीटी) साठी यंदा प्रथमच देण्यात येणारा पुरस्कार मिळाला.  ही मालिका एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनावर आधारित आहे जो उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक गावात पंचायत सचिव म्हणून नोकरीच्या इतर चांगल्या पर्यायांच्या अभावी रुजू होतो.  अभिषेक त्रिपाठी या मालिकेत जितेंद्र कुमार या मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हॉलिवूड अभिनेता/निर्माता मायकेल डग्लस यांना प्रदान करण्यात आला.

दिग्गज हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस यांना समारोप समारंभात प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. परस्पर भिन्न कलात्मक सांस्कृतिक अभिव्यक्ती असलेल्या लोकांना एकत्र आणण्याची आणि बदलण्याचे सामर्थ्य सिनेमात आहे असे मत डग्लस यांनी व्यक्त केले. दोन वेळचे  ऑस्कर पुरस्कार विजेते  डग्लस यांनी जागतिक सिनेमाची भाषा ही पूर्वीपेक्षा अधिक  जागतिक झाली असल्याकडेही लक्ष वेधले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) म्हणजे चित्रपट निर्मितीप्रक्रियेतील मंतरलेपणाची पुनर्अनुभूती करून देणारा आणि परस्पर भिन्न सांस्कृतिक कलात्मक अभिव्यक्ती ओलांडत, काळ, भाषा आणि भौगोलिक परिस्थितीच्या पलीकडे घेऊन जाणारा अनुभव असल्याचं ते म्हणाले.

अभूतपूर्व आणि पहिल्यांदाच अनुभवायला मिळालेल्या यशस्वी क्षणांनी मंतरलेला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर

इफ्फीच्या समारोप समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधीत केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी 54) हे 54 वे पर्व म्हणजे 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेला मूर्त रूप देत विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारा, तसेच कल्पक व्यक्तिमत्वे, चित्रपटकर्ते, सिनेरसिक आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणणारा उत्सव असल्याचे ते म्हणाले.

आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “वसुधैव कुटुंबकम” या तत्वज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी दिलेल्या नाऱ्याचे अनुसरण इफ्फीकडून देखील केले जात आहे. यंदाचा इफ्फी महोत्सव खऱ्या अर्थाने असामान्य, पहिल्यांदाच घडणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या उल्लेखनीय घडामोडींनी भरलेला आणि सर्वोत्तम चित्रपटनिर्मितीचे दर्शन घडवणारा महोत्सव होता, असे त्यांनी इफ्फीच्या समारोप समारंभात दिलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले. 

54व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या सुमारे 250 चित्रपटांमध्ये जवळपास 30,000 मिनिटे अवधीचे प्रदर्शन करण्यात आले ज्या चित्रपटांनी 78 देशांच्या 68 आंतरराष्ट्रीय आणि 17 भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व केले, असे त्यांनी नमूद केले.

“या महोत्सवात 23 मास्टरक्लासेस, थेट संवाद सत्रे ज्यामध्ये काही प्रत्यक्ष तर काही आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आली.  जवळपास 50 भव्य रेड कार्पेट गाला सोहळ्यांमुळे संपूर्ण महोत्सवाला भव्यता प्राप्त झाली. या महोत्सवाला आकार देण्यामध्ये आपला बहुमूल्य वेळ देणाऱ्या आणि समर्पित वृत्तीने वाहून घेणाऱ्या मान्यवर परीक्षक मंडळाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या पाठबळाबद्दल माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी आभार मानले. इफ्फीने समावेशकता आणि सर्वांनाच आनंद घेता येईल अशा प्रकारच्या सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करताना ठाकूर यांनी सांगितले की या महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन दिव्यांग सिनेरसिकांनांही मोठ्या पडद्यावर  सहजपणे पाहता यावे यासाठी सांकेतिक भाषा आणि श्राव्य वर्णनाची सोय करण्यात आली होती. महिलांच्या गुणवत्तेचा बहुमान करण्यासाठी आम्ही त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती त्यांनी दिली.  जुने दर्जेदार चित्रपट पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या प्रयत्नांचे अभिनंदन करत माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणाले की विविध भाषांमधील 5,000 पेक्षा जास्त चित्रपट 4k डिजिटल फॉरमॅटमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येतील जेणेकरून भारताच्या भावी पिढ्यांना या महान निर्मितींचा आनंद घेता येईल आणि त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करता येईल. “ 54व्या इफ्फीमध्ये विशेष प्रकारे रचना केलेल्या विभागात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत पुनरुज्जीवित केलेल्या सात चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यांची चित्रपट प्रेमींनी खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली, असे ठाकूर यांनी नमूद केले.

जुन्या सिनेमांचे जतन करणे आणि त्याचवेळी नव्या सिनेमांना चालना देण्याच्या आपल्या दुहेरी ध्येयउद्दिष्टांवरही ठाकूर यांनीमं भर दिला. 'सेव्हनटीफाई क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाअंतर्गतच्या 'फिल्म चॅलेंज' स्पर्धेच्या माध्यमातून युवांमधील कलागुणांचे दर्शन घडले असे ते म्हणाले. सर्जनशील युवा चित्रपटकारांनी सादर केलेले चित्रपट विचार करायला लावणारे होते, या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन असे महत्त्वाचे विषय हाताळले गेल्याची बाब त्यांनी नमूद केली. सेव्हनटीफाई क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाअंतर्ग चित्रपट सादर केलेल्या युवा चित्रपटकर्त्यांपैकी ४५ जणांना या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या कल्पना मांडण्याची संधी दिली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखीत केली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या [National Film Development Corporation of India (NFDC)] फिल्म बजारानंही आपल्या कक्षांचा विस्तार केला असून, विविधांगी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील असे उपक्रम सुरू केले आहेत, यामुळे परस्परदेशांमधल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक सहकार्यालाही चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 'व्हीएफएक्स अँड टेक पॅव्हेलियन' आणि माहितीपटासाठीच्या वर्गवारीच्या समावेशामुळे नवकल्पनांचे तसेच कथाबाह्य कलाकृतींच्या सादरीकरणाचे नवदर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.

मायकल डग्लस यांना 2023 या वर्षासाठीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारासाठी डग्लस यांच्या सोबत करत उपस्थीत राहून, इफ्फीसाठी आपलेल्या सगळ्यांच्या आनंदात भर टाकल्याबद्दल कॅथरीन झेटा जोन्स यांचेही त्यांनी आभार मानले. सुवर्ण मयूर पुरस्कार विजेत्यांसह इफ्फीमधील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजसाठीचा (ओटीटी) पहिल्या पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

हा चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या [National Film Development Corporation of India (NFDC)] पथकासह, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातल्या गोवा राज्य सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल ठाकूर यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणाच्या समारोपात सर्व चित्रपटकर्ते, कलाकार आणि निर्मात्यांचे अभिनंदन करत, सगळ्यांनी इफ्फीच्या अर्थात या महोत्सवापलिकडच्या जगातही आपल्या कलाकृतींमधून कथा सादर करण्याचा उत्साह, एकता आणि सर्जनशीलता पुढे नेत राहावी असे आवाहनही त्यांनी केले.

गोव्याला चित्रपटसृष्टीचा स्वर्ग बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

पाहुण्यांचे स्वागत करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात आयोजित करण्यात आलेला 54 वा इफ्फी महोत्सव हा कलात्मकता साजरी करण्याचा प्रवास असून कथाकथनाच्या क्षमतेचा दाखला आहे.

“या वर्षीचा इफ्फी महोत्सव सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे, ज्या ठिकाणी विविध समुदायांची अभिव्यक्ती आणि सिनेमॅटिक प्रतिभेची भरभराट होते. 75 हून अधिक  देशांचे चित्रपट प्रदर्शित करणारा हा महोत्सव , सिनेमाचे  वैविध्य आणि जिवंतपणाचे खरे प्रतिबिंब आहे,” ते म्हणाले. प्रमोद सावंत यांनी असेही सांगितले की हा महोत्सव गोव्यासाठी खास आहे, कारण गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून राज्याचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदाच्या चित्रपट महोत्सवात गोव्यातील चित्रपट निर्मात्यांचा सहभाग खरोखरच उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले.

परदेशी चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी भारतात येण्याबाबत दिलेल्या नियंत्रणाप्रति राज्याची बांधिलकी बळकट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हिरवीगार जंगले, नदी, धबधबे, गावे आणि भरगच्च भातशेती यामुळे गोवा चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन आहे, कारण हे राज्य पारंपारिक आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे.  “ चित्रपटांचे विविध ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी राज्याची सुव्यवस्थित प्रणाली विनाअडथळा परवानग्या देते.  गोव्याचा प्रदेश चित्रपट उद्योगासाठी नंदनवन बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.  अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणार्‍या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू आहेत”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

इफ्फीचे आंतरराष्ट्रीय ज्युरी अध्यक्ष शेखर कपूर म्हणाले की, संघर्ष आणि युद्धाने ग्रासलेल्या जगाच्या संदर्भात आपल्या कथा सांगणे आवश्यक आहे, त्यामुळे इफ्फी सारखे चित्रपट महोत्सव महत्त्वाचे आहेत. आपण जे आहोत, तेच आपल्या कथा सांगतात. कथा या मुळात आपण माणूस असण्याबद्दल असतात. माणूस असणे हा आपला मूलभूत पैलू आहे. जर आपण आपल्या कथा एकमेकांना सांगितल्या तर लोक सीमांचे बंधन ओलांडून त्या कथा ऐकतील आणि एकमेकांना समजूनही घेतील.”

ज्युरीचे सदस्य स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

पार्श्वगायक आणि चित्रपट संगीतकार हरिहरन, चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, ईशा गुप्ता, दिव्या दत्ता, उत्पल बोरपुजारी, चित्रपट निर्माता जेरोम पेलार्ड, हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन झेटा जोन्स, उपाध्यक्ष, आयसीएफटी सर्ग मिशेल, प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशनचे संचालक,  आयसीएफटी शुयुआन हुन हेदेखील यावेळी उपस्थित होते.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी आभार मानले.  एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे उपाध्यक्ष दलिलाह लोबो, गोव्याचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल, एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाच्या सीईओ अंकिता मिश्रा आणि इतर मान्यवरांनीही समारोप समारंभात सहभाग नोंदवला.

तारांकित कलाकारांच्या शानदार सादरीकरणाचा साक्षी असणारा हा समारंभाचे सूत्र संचालन  आयुष्मान खुराणा आणि मंदिरा बेदी यांनी  केले.

 

* * *

PIB Mumbai | Jaydevi/Sonali/Nandini/Rajshree/Shraddha/Shailesh/Tushar/D.Rane



(Release ID: 1980599) Visitor Counter : 201


Read this release in: Konkani , English , Urdu , Hindi