माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 3

आयसीएफटी-युनेस्को-इफ्फी भागीदारी महात्मा गांधी यांचे कालातीत आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न करते : आयसीएफटी-युनेस्कोचे उपाध्यक्ष सर्ज मिशेल


शांतता, बंधुता आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देणारा चित्रपट हा यंदाच्या आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठीचा निकष: ज्युरी सदस्य रिझवान अहमद

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2023

 

54 व्या इफ्फी मध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक 2023 साठी जगभरातील दहा चित्रपटांची निवड 5 सदस्यीय निवड समितीने (ज्युरी) केल्याचे आयसीएफटी-युनेस्को चे उपाध्यक्ष सर्ज मिशेल यांनी आज गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या (इफ्फी)निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत घोषित केले.

यंदाच्या निवड प्रक्रियेच्या निकषांबाबत बोलताना, ज्युरी सदस्य रिजवान अहमद, म्हणाले, “आयसीएफटी-युनेस्को, चित्रपटाकडे शांतता, बंधुता आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश  देणारे माध्यम म्हणून पाहते आणि म्हणूनच या बाबींचा विचार करून निर्णय प्रक्रिया राबवण्यात आली”. पुरस्कारासाठी निवडलेला चित्रपट केवळ इफ्फी प्रेक्षकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर वैविध्यपूर्ण प्रेक्षक समुदायाचा विचार करून केली जाईल असे रिझवान अहमद यांनी अधोरेखित केले.

"चित्रपटांचे बहुपदरी कथानक लक्षात घेऊन त्यांचे परीक्षण आणि निवड केली जाते. चित्रपट हे जगभरातील विविध संस्कृतींचे प्रतिनिधी आहेत" असे ते म्हणाले.

आयसीएफटी आणि इफ्फी यांच्या सहयोगाबद्दल बोलताना ज्युरी समन्वयक आणि आयसीएफटी युवा शाखा पीसीआय संचालक झ्युयुआन हुन म्हणाल्या की, भारत हे चित्रपट निर्माते, प्रतिभा, आणि चित्रपट बाजारपेठेचे मोठे केंद्र आहे.

आयसीएफटी च्या इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांबरोबरच्या सहयोगाशी तुलना करताना, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाची, भारताबरोबरचा अनोखा संबंध स्पष्ट करताना, त्या म्हणाल्या, "आयसीएफटी-युनेस्कोचे भारताबरोबर एक वेगळे नाते आहे, कारण इथे गांधीजींची शांतता आणि सौहार्दाची मूल्ये आहेत."  

आयसीएफटी-युनेस्कोचे भारताचे प्रतिनिधी मनोज कदम यांनी सांगितले की, आयसीएफटी, सामाजिक विकास आणि शांततेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या उच्च दर्जाच्या दृकश्राव्य माध्यमाला प्रोत्साहन देण्याबरोबरच, पायरसी विरोधातल्या लढाईचे समर्थनही करते.  

आयसीएफटी पॅरिस आणि युनेस्को (UNESCO) यांनी स्थापित केलेल्या, आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाने इफ्फी महोत्सवात दरवर्षी अशा चित्रपटाला सन्मानित केले जाते, जो महात्मा गांधी यांच्या शांतता, अहिंसा, करुणा आणि सौहार्दाच्या दृष्टीकोनाचे उत्तम प्रतिबिंब आहे.

2015 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, या पुरस्काराने गांधीजींच्या चिरस्थायी मूल्यांना मूर्त रूप देणाऱ्या चित्रपटांचा गौरव केला आहे.

पत्रकार परिषद येथे पहा:

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane




(Release ID: 1980086) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi , Konkani