विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एएनआरएफ विज्ञान संशोधनासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये समन्वय घडवून आणेल: एसईआरबी सचिव

Posted On: 25 NOV 2023 5:52PM by PIB Mumbai

 

भारतात ज्या पद्धतीने संशोधन केले जाते आणि त्याला सहाय्य केले जाते, त्यामध्ये अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरएफ) मोठे परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास, विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाचे (एसईआरबी) सचिव आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अखिलेश गुप्ता यांनी व्यक्त केला. 24 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विज्ञान पत्रकारांच्या परिषदेत ते बोलत होते.

भारतातील विज्ञान पत्रकारिता बळकट करण्याबाबत आयोजित भारतीय विज्ञान पत्रकार संघाच्या परिषदेत डॉ. गुप्ता म्हणाले, “एएनआरएफ विज्ञान संशोधनासाठी सरकारी, शैक्षणिक आणि खाजगी क्षेत्र यांच्यात समन्वय निर्माण करेल आणि जागतिक स्तरावर त्याचे महत्त्व वृद्धिंगत करेल.

देश सध्या मूलभूत विज्ञान शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत असून बहुतांश भारतीय संशोधन आणि विकास संस्था मूलभूत विज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहेत असे ते म्हणाले. सरकारी निधीच्या बरोबरीने खाजगी-क्षेत्राच्या योगदानाचा लाभ घेऊन अभिनव आणि परिवर्तनात्मक संशोधनाला सहाय्य करणे हे एएनआरएफचे उद्दिष्ट आहे. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या तीन प्रमुख घटकांमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय एसईआरबी मोड फंडिंग सुरु ठेवणे, सखोल संशोधनासाठी अतिरिक्त निधी वितरित करणे आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि उद्योग सहकार्यासाठी अभिनव अर्थसहाय्य प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक सायबर सुरक्षा, क्वांटम ही सर्वोच्च प्राधान्याची क्षेत्रे असून इतर नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासात खाजगी क्षेत्राने गुंतवणूक केली तर संशोधनाला सरकारी आणि खासगी अशी दोन्ही प्रकारची मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आयआयटी आणि आयआयएसईआर सारख्या प्रमुख संस्था उच्च संशोधन गुणवत्ता, प्रगत पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांचे कौशल्य प्रदर्शित करत असल्यामुळे भारताची वैज्ञानिक परिसंस्था तग धरून उभी आहे. राज्यस्तरीय विद्यापीठांमध्ये, त्यांच्या युवा संशोधकांमध्ये लक्षणीय क्षमता असून त्याकडे लक्ष देण्याची आणि ती विकसित करण्याची गरज आहे. हीच क्षमता वापरण्याचा एएनआरएफ प्रयत्न करेल,” असे डॉ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

एएनआरएफ आपल्या नवीन स्वरुपासह भारतातील वैज्ञानिक संशोधन प्रमाण, वाव आणि गुणवत्तेच्या बाबतीत उत्तुंग झेप घेईल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरणाच्या विचाराधीन मसुद्यानुसार, प्रत्येक संस्थेने चुकीच्या वृत्तांसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी विज्ञान संप्रेषण शाखा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यात वैज्ञानिक बाबींबाबत माध्यमांना शिक्षित करण्यावर भर दिला आहे.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979783) Visitor Counter : 41