संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि नेपाळ यांच्यात सतरावा ' सूर्यकिरण लष्करी सराव' पिठोरागड येथे सुरू

Posted On: 24 NOV 2023 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023

भारत आणि नेपाळ यांच्यात 17 व्या 'सूर्यकिरण संयुक्त लष्करी सरावातसहभागी होण्यासाठी नेपाळच्या लष्करातील 334 जणांची तुकडी भारतात दाखल झाली आहे.  उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे आजपासून  7 डिसेंबर  2023पर्यंत हा सराव चालणार आहे. दरवर्षी हा सराव केला जात असून दोन्ही देश आळीपाळीने  त्याचे आयोजन करतात.

या सरावात भारतीय लष्करातील 354 जणांची तुकडी सहभागी झाली  असून तिचे नेतृत्व कुमाऊँ रेजिमेंटच्या बटालियनकडे आहे. नेपाळच्या लष्करी तुकडीचे प्रतिनिधीत्व तारा दल बटालियन करत आहे.

या सरावाचे उद्दिष्ट जंगलातले  युद्ध, पर्वतीय भूभागातील दहशतवादविरोधी मोहिमा  आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेअंतर्गत शांती मोहिमांमध्ये  मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणामध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे हे आहे. सरावामध्ये, ड्रोन आणि काउंटर ड्रोन उपाय, वैद्यकीय प्रशिक्षण, विमानचालनाशी संबंधित बाबी आणि पर्यावरण संवर्धन यावर भर दिला जाईल. या उपक्रमांद्वारे, सैनिकांना आपली कार्यान्वयन क्षमता वाढवता येईलत्यांची लढाऊ कौशल्ये सुधारता येतील  आणि आव्हानात्मक परिस्थितीत  समन्वय बळकट करता येईल.

हा सराव भारत आणि नेपाळमधील सैनिकांना कल्पना आणि अनुभवांचे आदानप्रदान  करण्यासाठी,   सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी  आणि एकमेकांच्या कार्यान्वयन प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल.

सूर्यकिरण सराव, भारत आणि नेपाळ यांच्यातील  मैत्री, विश्वास, समान सांस्कृतिक संबंधांचे मजबूत बंध दर्शवतो. व्यापक संरक्षण सहकार्याप्रती दोन्ही देशांची अतूट बांधिलकी दाखवून उत्तम फलनिष्पत्तीसाठी मंच पुरवतो.  सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करणे आणि दोन मैत्रीपूर्ण शेजारी देशांमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणेहे या सरावाचे उद्दिष्ट आहे.

 

G.Chippalkatti/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979481) Visitor Counter : 181


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi