पंतप्रधान कार्यालय

संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरा इथे आयोजित कार्यक्रमातील पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 23 NOV 2023 8:51PM by PIB Mumbai

राधे-राधे! जय श्रीकृष्ण!

कार्यक्रमाला उपस्थित ब्रज इथले  पूज्य संतगण, उत्तर प्रदेशच्या  राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ जी, दोन्ही उप-मुख्यमंत्री, मंत्री मंडळातले  सहकारी, मथुरेच्या खासदार भगिनी 

हेमामालिनी जी, आणि माझ्या प्रिय ब्रजवासीयानो!

राजस्थानच्या निवडणूक प्रचारामुळे  मला  यायला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.प्रचार मैदानातून आता या भक्तिमय वातावरणात आलो आहे.आज  ब्रज दर्शनाची संधी,ब्रजवासीयांच्या दर्शनाची संधी मला लाभली हे माझे भाग्य आहे.  कारण इथे अशी व्यक्ती येते ज्यांना श्रीकृष्ण आणि श्रीजी बोलावतात.ही भूमी असाधारण आहे.ब्रज आपल्या ‘श्यामा-  श्याम जू’ यांचे धाम आहे.

ब्रज ‘लाल जी’ आणि ‘लाड़ली जी’ यांच्या प्रेमाचा साक्षात अवतार आहे.हे ब्रज आहे जिथले रजकणही अवघ्या जगासाठी पूजनीय आहेत. ब्रजच्या कणा- कणात राधा-राणी आहे, इथल्या कणा- कणात कृष्ण सामावलेला आहे. म्हणूनच आपल्या पुराणात म्हटले आहे,

सप्त द्वीपेषु यत् तीर्थ, भ्रमणात् च यत् फलम्। प्राप्यते च अधिकं तस्मात्, मथुरा भ्रमणीयते॥ 

म्हणजेच जगातल्या सर्व तीर्थ यात्रांचे जे पुण्य मिळते त्यापेक्षा जास्त केवळ मथुरा आणि ब्रज यात्रेतून प्राप्त होते. आज ब्रज रज महोत्सव आणि संत मीराबाई जी यांच्या  525 वा जयंती  समारंभाच्या माध्यमातून ब्रज मध्ये पुन्हा एकदा येण्याची, आपणा सर्वाना भेटण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. ब्रजचे स्वामी भगवान कृष्ण आणि राधा राणी यांना मी विनम्र नमन करतो. मीराबाई यांच्या चरणी नतमस्तक होतानाच ब्रजच्या संतगणांना मी वंदन करतो.खासदार भगिनी हेमामालिनी जी यांचेही मी अभिनंदन करतो. त्या तर खासदार आहेत मात्र ब्रज मध्ये लीन झाल्या आहेत.केवळ खासदार म्हणून नव्हे तर स्वतः कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन प्रतिभा आणि सादरीकरण करत हा  कार्यक्रम अधिक भव्य करण्याचे काम करत आहेत.

माझ्या कुटुंबियांनो,

या कार्यक्रमासाठी येणे माझ्यासाठी आणखी एका कारणामुळे विशेष आहे.भगवान श्रीकृष्णापासून ते मीराबाईंपर्यंत ब्रजचे गुजरातशी आगळे नाते राहिले आहे. मथुरेचा कान्हा गुजरातमध्ये द्वारकाधीश झाले आणि राजस्थानमधून येऊन मथुरा-वृंदावन मध्ये प्रेम धारेचा वर्षाव करणाऱ्या संत मीराबाई जी यांनीही आपला अंतिम काळ द्वारकेत व्यतीत केला होता.  मीराबाईंची भक्ती वृंदावनावाचून अपुरी आहे.संत मीराबाई यांनी वृंदावन भक्तीने चिंब होऊन म्हटले होते, - आली री मोहे लागे वृन्दावन नीको...घर-घर तुलसी ठाकुर पूजा, दर्शन गोविन्दजी कौ....

म्हणूनच गुजरातच्या लोकांना उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधल्या  ब्रज मध्ये येण्याचे भाग्य लाभते तेव्हा आम्ही ती द्वारकाधीशांची कृपा मानतो.मला तर गंगामातेने बोलावले आणि भगवान द्वारकाधीशांच्या कृपेने 2014 पासूनच आपल्या सेवेत लीन झालो आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

मीराबाई यांचा 525 वा जन्मोत्सव केवळ एका संताचा जन्मोत्सव नाही.हा भारताच्या संपूर्ण संस्कृतीचा उत्सव आहे. हा भारताच्या प्रेम परंपरेचा उत्सव आहे.हा उत्सव नर आणि नारायण,जीव आणि शिव, भक्त आणि भगवान  एकरूप मानणाऱ्या विचारांचाही उत्सव आहे.ज्याला कोणी अद्वैत असेही म्हणतात. आज या महोत्सवात मला संत मीराबाई यांच्या नावाचे नाणे आणि टपाल तिकीट  जारी करण्याचे भाग्य लाभले. देशाचा सन्मान आणि संस्कृती यासाठी बलिदान देणाऱ्या राजस्थानच्या वीरभूमीमध्ये मीराबाई यांचा जन्म झाला होता.84 कोसाचे हे ब्रज मंडल उत्तर प्रदेश आणि राजस्थानला जोडते.मीराबाई यांनी भक्ती आणि आध्यात्माच्या अमृतधारेने  भारताच्या चैतन्याचे  सिंचन केले. मीराबाईंनी भक्ती,समर्पण आणि श्रद्धा अतिशय सोप्या भाषेत उलगडले-  

- मीराँ के प्रभु गिरधर नागर, सहज मिले अबिनासी, रे ।। 

त्यांच्यावरच्या भक्तीसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम भारताच्या भक्ती बरोबरच भारताचे शौर्य आणि बलिदान यांचेही स्मरण करून देतो.मीराबाई यांच्या कुटुंबाने आणि राजस्थानने  त्या काळी आपले सर्वस्व अर्पण केले होते. आपल्या श्रद्धा स्थानांच्या रक्षणासाठी, भारताचा आत्मा, भारताच्या चैतन्याच्या रक्षणासाठी   राजस्थान आणि देशाची जनता ढाल बनून उभी होती. म्हणूनच आजचा हा समारंभ आपल्याला मीराबाई यांच्या प्रेम परंपरेबरोबरच त्या पराक्रमाच्या परंपरेचेही स्मरण करून देतो आणि हीच भारताची ओळख आहे. आपण एकाच कृष्णाच्या ठायी पावा वाजवणारा कृष्णही पाहतो आणि सुदर्शन चक्रधारी वासुदेवही त्याच्याच ठायी पाहतो.

माझ्या कुटुंबियांनो,

भारत  नेहमीच नारीशक्तीचे पूजन करत आला आहे. ब्रजवासियांखेरीज ही  बाब आणखी कोण उत्तम रीतीने जाणू शकतो.इथे कन्हैय्या नगरातही   

‘लाड़ली सरकार’चे उपक्रम राबवले जातात.इथले संबोधन,संवाद, आदर्संमान सर्व काही राधे-राधे स्मरणाने सुरु होते.कृष्णाच्या नावाआधी राधा हा शब्द येतो तेव्हाच त्याचा नावाला पूर्णत्व येते.म्हणूनच आपल्या देशातल्या नारीशक्तीने नेहमीच जबाबदारी स्वीकारलीही आहे आणि समाजाला सातत्याने मार्गदर्शनही केले आहे.मीराबाई याचेही एक उदाहरण आहेत. मीराबाई यांनी म्हटले आहे  - जेताई दीसै धरनि गगन विच, तेता सब उठ जासी।। इस देहि का गरब ना करणा, माटी में मिल जासी।। 

म्हणजे ही भूमी आणि आकाश यांच्यामध्ये जे सर्व काही आहे ते नश्वर आहे. यामधे किती  गहन तत्वज्ञान दडले आहे हे आपण सर्वजणही जाणू शकतो.

मित्रांनो,

संत मीराबाईंनी त्या कालखंडात समाजाला असा मार्ग देखील दाखवला, ज्याची त्या काळात सर्वात जास्त गरज होती. भारताच्या अशा कठीण काळात मीराबाई सारख्या संतांनी दाखवून दिले की इच्छाशक्ती असेल तर संपूर्ण जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य मिळवता येते. त्या संत रविदास यांना आपले गुरु मानत आणि त्या हे खुल्या मनाने म्हणत देखील असत,
“गुरु मिलिआ संत गुरु रविदास जी, दीन्ही ज्ञान की गुटकी”.
म्हणूनच मीराबाई मध्ययुगातील केवळ एक महिला संतच नव्हत्या तर महान समाजसुधारक आणि मार्गदर्शकांपैकी एक देखील होत्या.

मित्रांनो,

मीराबाई आणि त्यांच्या रचना असा ज्ञानाचा प्रकाश आहेत, जो प्रत्येक युगात, प्रत्येक काळात तितकाच प्रासंगिक आहे. जर आपण आजच्या, वर्तमान काळातली आव्हानं बघितली, तर मीराबाई आपल्याला जुनाट रूढीपासून मुक्त होऊन आपल्या नीतीमूल्यांशी प्रामाणिक राहण्याची शिकवण देतात. मीराबाई म्हणतात,
मीराँ के प्रभु सदा सहाई, राखे विघन हटाय।
भजन भाव में मस्त डोलती, गिरधर पै बलि जाय?

त्यांच्या भक्तीत निरागसता आहे, पण दृढनिश्चय देखील आहे. कुठल्याच संकटाला त्या घाबरत नाहीत. त्या फक्त सातत्याने आपलं काम करत राहण्याची प्रेरणा देतात.

माझ्या कुटुंबियांनो,

आजच्या या प्रसंगी मी भारतभूमीचे आणखी वैशिष्ट्य सांगू इच्छितो. या भारत भूमीची ही अद्भुत क्षमता आहे, की जेव्हा जेव्हा तिच्या चेतनेवर हल्ला झाला, जेव्हा जेव्हा तिची चेतना दुर्बल ठरली, तेव्हा देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून एका जागृत उर्जेने भारताला दिशा दाखविण्याचा संकल्प देखील केला आणि पराक्रम देखील गाजवला.  आणि हे पुण्य कार्य सिद्धीस नेण्यासाठी कुणी योद्धा तरी आला किंवा संत तरी आला. भक्तिकाळातले आपले संत, याचे अप्रतिम उदाहरण आहेत. त्यांनी वैराग्य आणि विरक्तीची नवनवीन उदाहरणं समाजापुढे ठेवली, आणि सोबतच आपल्या भारताची जडणघडण देखील केली. तुम्ही पूर्ण भारत बघा, दक्षिणेत आलवार संत आणि नायनार संत होऊन गेले, रामानुजाचार्य यांच्यासारखे आचार्य होते! उत्तर भारतात तुलसीदास, कबीरदास, रविदास आणि सूरजदास यांच्यासारखे संत होऊन गेले! पंजाबमध्ये गुरु नानकदेव होऊन गेले. पूर्व भारतात बंगालचे चैतन्य महाप्रभुंसारख्या संतांच्या ज्ञानाचा प्रकाश तर आज संपूर्ण जगात पसरला आहे. पश्चिम भारतात देखील गुजरात मध्ये नरसी मेहता, महाराष्ट्रात तुकाराम आणि नामदेव यांच्यासारखे संत होऊन गेले! सर्वांची भाषा वेगवेगळी होती, रिती रिवाज आणि परंपरा वेगवेगळ्या होत्या. मात्र तरीसुद्धा सर्वांचा संदेश एकच होता, उद्देश एकच होता. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भक्ति आणि ज्ञानाचे जे प्रवाह सुरू झाले, ते एकत्र आले आणि संपूर्ण भारताला एका धाग्यात जोडण्याचे काम त्यांनी केले.

आणि मित्रांनो,

मथुरेसारखं हे पवित्र स्थळ तर, भक्ती आंदोलनाच्या या विविध प्रवाहांचे संगम स्थान राहिले आहे. मलूकदास, चैतन्य महाप्रभु, महाप्रभु वल्लभाचार्य, स्वामी हरिदास, स्वामी हित हरिवंश प्रभु यांच्यासारखे कितीतरी संत इथे आले! त्यांनी भारतीय समाजात नवी चेतना जागृत केली, नवे प्राण फुंकले. हा भक्ति यज्ञ आजही भगवान श्री कृष्णाच्या आशीर्वादाने सातत्याने सुरू आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

वृंदावन बद्दल आपल्या संतांनी म्हणून ठेवलं आहे, वृन्दावन सौं वन नहीं,
नन्दगाँव सौं गाँव।
बंशीवट सौं वट नहीं,
कृष्ण नाम सौं नाँव॥

याचा अर्थ असा आहे, वृन्दावन सारखे पवित्र वन कुठलेच नाही आणि कुठेच नाही. नंदगाव सारखे पवित्र गाव कुठेच नाही. इथल्या बंशीवट सारखे वडाचे झाड कुठेच नाही .. आणि कृष्णनामा सारखे कल्याणकारी नाव दुसरे कुठलेच नाही. वृंदावन भक्ति आणि प्रेमाची भूमी तर आहेच, हे आपल्या साहित्य, संस्कृती आणि सभ्यतेचे एकत्रित केंद्र राहिले आहे. या क्षेत्राने अत्यंत कठीण आणि खडतर काळात देखील देशाला सांभाळले आहे. मात्र देश स्वतंत्र झाला, तेव्हा जे महत्व या पवित्र तीर्थ क्षेत्राला मिळायला हवे होते, ते मिळाले नाही, हे दुर्दैव आहे. जे लोक भारताच्या भूतकाळापासून देशाला तोडू इच्छित होते, जे लोक भारतीय संस्कृती, त्याची आध्यात्मिक ओळख यापासून अलिप्त होते, ते लोक स्वातंत्र्यानंतरही गुलामगिरीची मानसिकता सोडू शकले नाही, त्यांनी वृंदावनच्या भूमीला विकासापासून वंचित ठेवले.

बंधू भगिनींनो,

आज स्वातंत्र्याच्या अमृत काळात पहिल्यांदाच देश गुलामीच्या त्या मानसिकतेतून बाहेर आला आहे. आपण लाल किल्ल्यावरून ' पंच प्रणांचा  संकल्प केला आहे. आपण आज आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना बाळगत पुढे वाटचाल करतो आहोत. आज काशी इथे विश्वनाथ धाम भव्य रुपात आपल्या समोर आहे. आज उज्जैन महाकाल महालोक इथे दिव्यते सोबतच भव्य रुपात ही दर्शन देत आहेत. आज केदार खोऱ्यात केदार नाथ जी यांचे दर्शन करून लाखों लोक धन्य होत आहेत.
आणि आता तर, अयोध्येत भगवान श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तिथी देखील आली आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा ब्रज क्षेत्रात देखील भगवान के दर्शन अधिक दिव्यत्वासह होतील. मला आनंद आहे की ब्रज च्या विकासासाठी ' उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदे ' ची स्थापना करण्यात आली आहे. ही परिषद भाविकांची सुविधा आणि तीर्थ विकसासाठी अनेक कामे करत आहे. ' ब्रज रज महोत्सव ' सारखे विकास कार्यक्रम विकासाच्या या प्रवाहात आपला प्रकाश देखील पसरवत आहेत..

मित्रांनो,

हा संपूर्ण प्रदेश कान्हा च्या लीलांशी संबंधित प्रदेश आहे. मथुरा, वृंदावन, भरतपूर, करौली, आग्रा, फिरोजाबाद, कासगंज, पलवल, बल्लभगढ़ सारखे भाग वेगवेगळ्या राज्यात आहेत भारत सरकारचे हेच प्रयत्न आहेत kk वेगवेगळ्या राज्यांसोबत एकत्रितपणे ह्या संपूर्ण प्रदेशाचा विकास केला जावा.

मित्रांनो,

ब्रज क्षेत्रात, एकूणच देशात होत असलेले हे बदल, हा विकास केवळ व्यवस्थेत होत असलेला बदल नाही, तर हे आपल्या राष्ट्राच्या बदलत्या स्वरूपाचे, त्याच्यात पूनर्जागृत होत असलेल्या चेतनेचे प्रतीक आहे. आणि महाभारतात तर याचा दाखलाच दिला आहे, की जिथे भारताचे पुनरुत्थान होत असते, तेव्हा त्याच्या मागे भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद नक्की असतात. याच आशीर्वादाच्या शक्तीवर आपण आपले संकल्प पूर्ण करणार आहोत आणि विकसित भारताची उभारणीही करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद देतो.
राधे राधे ! जय श्रीकृष्ण!

***

Jaydevi PS/NC/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979390) Visitor Counter : 93