माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माझा भौतिक सीमांवर विश्वास नाही केवळ मानवतेवर विश्वास आहे : बंगाली चित्रपट ‘फरेशतेह’ चे दिग्दर्शक मूर्तिझा अताशझमझम


भावना अनुभवण्यासाठी अभिनेत्याने ती व्यक्तिरेखा जगायला हवी आणि प्रेक्षकांसमोर अगदी प्रामाणिकपणे सादर करायला हवी : अभिनेता सुमन फारुख

Posted On: 23 NOV 2023 8:09PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 23 नोव्‍हेंबर 2023

 

“मानवता हा जगातील सर्वोत्तम धर्म आहे” असे बांगलादेशी चित्रपट फरेश्तेहचे दिग्दर्शक मू अताशझमझम म्हणाले. काल 54 व्या इफ्फीमध्ये ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ श्रेणी अंतर्गत या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला. बांगलादेशी अभिनेते सुमन फारुख यांच्यासमवेत मूर्तिझा यांनी आज माध्यमे, प्रतिनिधी आणि सिने रसिकांशी संवाद साधला.

फरेशतेह हा बंगाली भाषेतील एक बांगलादेशी चित्रपट आहे आणि इराण आणि बांगलादेशची  संयुक्त निर्मिती आहे. फरेश्तेह आणि तिचा पती अमजद या जोडप्याची ही कथा आहे, जे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. या चित्रपटात जया अहसान फरेश्तेहच्या आणि सुमन फारुख अमजदच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाविषयी बोलताना  मूर्तिझा  म्हणाले की, ते लोकांच्या मनातील ऐकून लोकांना आणि त्यांच्या वेदनांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. याच तत्त्वज्ञानाच्या आधारे एका छोट्या टीमने  मर्यादित खर्चात फरेश्तेह चित्रपट तयार केला आहे. चित्रपट निर्मितीमागील प्रेरणांबद्दल बोलताना ते म्हणाले की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते तेव्हा आपण कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास आणि कोणत्याही अडचणीवर मात करण्यास तयार असतो. इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपला चित्रपट दाखविल्याबद्दल त्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.

  

भारताविषयी बोलताना इराणचे दिग्दर्शक मूर्तिझा  म्हणाले की, भौतिक सीमांवर त्यांचा विश्वास नाही , केवळ मानवतेवर विश्वास आहे. इराणमधील लोकांना भारत आणि भारतीय संस्कृती विशेषत: बॉलीवूड आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात चित्रपट बनवण्याच्या संधीची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनेता सुमन फारुख याने देखील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठित मंचावर आपल्या चित्रपटाचा प्रीमियर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि हा  ‘स्वप्न साकार झाल्याचा  क्षण’ आहे असे सांगितले.

 

* * *

PIB Mumbai | R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979238) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada