माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'द रेल्वे मेन' ही अनाम वीरांच्या शौर्यालावाहिलेली आदरांजली आहे: 54 व्या इफ्फीमध्ये अभिनेता के के मेनन
दिग्दर्शक शिव रवैल यांनी 'द रेल्वे मेन' च्या निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रियेची दिली माहिती
" द रेल्वे मेन ही वेब मालिका म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या शौर्याला आदरांजली आहे ज्यांना आपण सर्वजण गृहीत धरतो, त्या अनाम वीरांना , विशेषत: ज्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेच्या त्या भयंकर रात्री लोकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले,त्यांचा सन्मान करते " असे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द रेल्वे मेन वेब सिरीजमधील मुख्य अभिनेत्यांपैकी एक के के मेनन यांनी आज गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
चार भागांची ही वेब सिरीज 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेतील सत्य घटनांवर आधारित आहे.
माध्यमांना संबोधित करताना, दिग्दर्शक शिव रवैल यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रियेबद्दल विचार सामायिक केले. मुख्य पात्रे कोणाची भूमिका पार पाडत आहेत याची संवेदनशीलता लक्षात घेऊन योग्य संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची कलाकार आणि अन्य चमू काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. हीच भावना व्यक्त करताना ते म्हणाले, "निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते या नात्याने, या शोकांतिकेशी अनेक कुटुंबांचे भावनिक संबंध जोडलेले आहेत त्यामुळे त्या वेदनांप्रति संवेदनशील असणे ही आपली जबाबदारी आहे". त्यांनी हे देखील नमूद केले की वास्तविक जीवनातील घटनांचे चित्रण करण्याचा प्रयत्न करताना कोणतीही कसर सोडली नाही मात्र हे माध्यम लक्षात घेता काही प्रमाणात नाट्य असणे आवश्यक आहे.
रेल्वे मेन मागच्या कल्पनेबद्दल सांगताना लेखक आयुष गुप्ता म्हणाले की, रेल्वेची कथा सांगण्याचा आणि या संस्थेने बचावासाठी प्रयत्न करताना लोकांच्या सुटकेसाठी आपले संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्क कसे एकत्र आणले हे सांगण्याचा उद्देश यामागे आहे.
यात आर माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून भावनिक खोली आणि वास्तविक जीवनातील कथा प्रेक्षकांना मोहित करतात. ही मालिका सध्या नेटफ्लिक्स वर दाखवण्यात येत आहे आणि ती 18 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाली.
द रेल्वे मेन हे नेटफ्लिक्सवरील 4 भागांचे थरारक नाट्य आहे जे अनाम वीरांचे - भारतातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे - ज्यांनी भोपाळ गॅस दुर्घटनेच्या दुर्दैवी रात्री आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन एका असहाय्य शहरात अडकलेल्या हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवले.
संपूर्ण संवाद येथे पहा:
***
Jaydevi PS/Sushama/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979007)
Visitor Counter : 111