माहिती आणि प्रसारण मंत्रालय
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर 54 व्या इफ्फीमध्ये ‘इन कॉन्व्हर्सेशन’ संवाद सत्रात झाले सहभागी
चित्रपटनिर्मिती हा एक नैसर्गिक प्रवास आहे जिथे अपयश ही यशाची पहिली पायरी असते : मधुर भांडारकर
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2023
राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते मधुर भांडारकर यांनी आज गोव्यातील कला अकादमी येथे 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून 'इन कॉन्व्हर्सेशन' संवाद सत्रात सहभागी झाले. चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांच्याशी केलेल्या उत्स्फूर्त संभाषणात समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या या दिग्दर्शकाने सिनेमाची कला, चित्रपट निर्मितीतील बारकावे आणि कथा सादरीकरणाला आकार देणारी आव्हाने आणि प्रेरणा याबाबत आपले विचार मांडले.
वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या भांडारकर यांनी अस्सल कथा सादरीकरणाचे मर्म आणि चित्रपट निर्मितीतील गुंतागुंत याबाबत विचार सामायिक केले.

त्यांच्या संवादाच्या केंद्रस्थानी वास्तववाद आणि सिनेमा यांच्यातील समन्वयावर उत्कट भर होता. “चित्रपट एका कल्पनेतून निर्माण होतो. सिनेमॅटिक परिदृश्यात वास्तववादी सिनेमाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. वास्तववादी चित्रपटांमध्ये कलात्मक आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रभावशाली असण्याची दुहेरी कसरत सांभाळतानाच प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची शक्ती असते ”असे भांडारकर म्हणाले.
चित्रपटनिर्मितीतील संशोधनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून संशोधन हा त्यांच्या कलेचा कणा असल्याचे नमूद केले. ते म्हणले की, "संशोधन हा चित्रपट निर्मितीचा यूएसपी आहे. कथा सादरीकरण, कथनाला सखोलता आणि प्रामाणिकतेची जोड देऊन समृद्ध करणारा हा पाया आहे."
चित्रपट दिग्दर्शकांसमोरील आव्हानांना विशेषत: आर्थिक आणि सर्जनशील स्वातंत्र्यासारख्या आव्हानांबाबत, भांडारकर यांनी प्रांजळपणे कबूल केले की, “बॉक्स ऑफिसच्या यशासाठी कोणताही नियम नाही. वित्त पुरवठा आणि आशयाचे स्वातंत्र्य मोठी आव्हाने उभी करतात. मात्र नवोदित चित्रपट दिग्दर्शकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ''
चित्रपट निर्मितीच्या नैसर्गिक स्वरूपावर भर देत भांडारकर यांनी अपयश हा सर्जनशील प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे या कल्पनेचे समर्थन केले. "चित्रपट निर्मिती हा एक नैसर्गिक प्रवास आहे जिथे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी ते अपरिहार्य आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

नवोदित चित्रपट दिग्दर्शकांना मोलाचा सल्ला देताना भांडारकर यांनी श्रद्धा आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. "चित्रपट निर्मितीतील सर्जनशील समाधानासाठी अतूट विश्वासाची गरज असते. हा मार्ग सोपा नाही, परंतु पटकथेवर आणि स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वोत्तम आहे," असा सल्ला त्यांनी दिला.
प्रख्यात दिग्दर्शकाने आपल्या प्रेरणेचा स्त्रोत देखील उघड केला, "माझ्या चित्रपटांसाठी मला समाजाकडून प्रेरणा मिळते. समाजाची नाडी समजून घेतल्याने मी पडद्यावर आणलेल्या कथांना बळ मिळते."
शेवटी, भांडारकर यांनी प्रभावी चित्रपट तयार करण्यासाठी खिळवून ठेवणाऱ्या पटकथेच्या अपरिहार्य भूमिकेवर भर दिला. "खिळवून ठेवणारी पटकथा ही एका चांगल्या चित्रपटाची हृदयाची स्पंदने असते," असे सांगत त्यांनी चित्रपट निर्मितीचे सार विशद केले.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1978963)
आगंतुक पटल : 165