माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘ए वतन मेरे वतन’ : चित्रपटाच्या माध्यमातून धैर्याला केलेला सलाम
‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया : “आजच्या काळातील प्रेक्षकांना गुंगवून टाकणारा चित्रपटीय अनुभव देण्यासाठी इतिहासातून घेतलेली प्रेरणा”
जर तुमचे हृदय योग्य ठिकाणी गुंतले असेल तर इतर सर्व गोष्टी जादुई पद्धतीने कशा जुळून येतात हा खरोखरीच चमत्कार आहे : दिग्दर्शक कन्नन अय्यर
‘ए वतन’ हा सत्य घटनांनी प्रेरित होऊन घडवलेली उत्कट कथा आहे : करण जोहर
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2023
गोवा येथे आयोजित 54 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज झालेल्या रोचक गट चर्चेत, ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना गुंगवून टाकणारा चित्रपटीय अनुभव देण्यासाठी इतिहासातून प्रेरणा घेण्याच्या कलेची माहिती दिली.
या चर्चेत सहभागी झालेल्या तज्ञांमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक कन्नन अय्यर, निर्माते करण जोहर, आघाडीची अभिनेत्री सारा अली खान, प्राईम व्हिडीओ कंपनीच्या हेड ऑफ ओरिजिनल्स (भारत आणि आग्नेय आशिया) अपर्णा पुरोहित तसेच धर्मा प्रोडक्शन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांचा समावेश होता. रोहिणी रामनाथन यांनी प्राईम व्हिडीओ कंपनीच्या सहयोगाने या चर्चेचे सूत्रसंचालन केले.
भारता छोडो चळवळीत, रेडीओ प्रसारणाचे आयोजन करण्यात प्रमुख गांधीवादी नेत्या आणि स्वातंत्र्य सैनिक उषा मेहता (जन्म 25 मार्च 1920 -कालवश-11 ऑगस्ट 2000) यांची भूमिका प्रसिद्ध आहे. न्यायाप्रती उषा मेहता यांची कटिबद्धता आणि आदर्श गांधीवादी म्हणून त्यांची भूमिका यामुळे त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या. वसाहतवादी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या धाडसी प्रयत्नांचा सन्मान म्हणून भारत सरकारने वर्ष 1998 मध्ये त्यांना पद्म विभूषण हा देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवले. स्वातंत्र्यासाठी उभ्या भारत देशाने केलेल्या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या असामान्य स्त्रीची कथा हा चित्रपट आपल्याला सांगतो.
या सत्रादरम्यान, प्रेक्षकांनी तुडूंब भरलेल्या सभागृहात, मनोगत व्यक्त करताना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यामागील दृष्टीकोन आणि प्रेरणा सर्वांसमोर मांडल्या.दिग्दर्शक कन्नन अय्यर यांनी त्यांची प्रेरणा आणि चित्रपटाची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, “जर तुमचे हृदय योग्य ठिकाणी गुंतले असेल तर इतर सर्व गोष्टी जादुई पद्धतीने कशा जुळून येतात हा खरोखरीच चमत्कार आहे. कथेच्या संदर्भात आपल्या हृदयाची जोपासना करणे महत्त्वाचे आहे.” स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊनही बहुतेकदा दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांकडे सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या उषा मेहता हे प्रमुख पात्र हे या चित्रपटाचे अनोखे वैशिष्ट्य ठरले आहे.
चित्रपटात उषा मेहता यांचे पात्र रंगवणारी अभिनेत्री सारा अली खान हिने यावेळी बोलताना बहुतांश प्रसंगी दुर्लक्षित राहिलेल्या स्वातंत्र्य सैनिक स्त्रिया आणि त्यांच्या त्यागाच्या तसेच शौर्याच्या कधीच कोणाला न समजलेल्या कथा यावर प्रकाश टाकण्याप्रती या चित्रपटाच्या कटिबद्धतेवर अधिक भर दिला. आपले ज्या गोष्टीवर प्रेम आहे,विशेषतः भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात जी गोष्ट आपल्याला मनापासून हवी आहे ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक धैर्याचा तिने यावेळी ठळक उल्लेख केला.
इफ्फीच्या सर्वदूर पसरणाऱ्या उर्जेचे आणि उत्सुकतेचे वर्णन करून करण जोहर म्हणाले की ‘ए वतन’ हा चित्रपट म्हणजे उषा मेहता यांच्या संवेदनशीलतेवर अधिक लक्ष केंद्रित करत, सत्य कथांपासून प्रेरणा घेऊन निर्मिलेली उत्कट गोष्ट आहे. स्वतःच्या देशाप्रती अत्यंत उत्कटतेने समर्पित असलेल्या व्यक्तींसमोर येणाऱ्या अडथळ्यांवर अधिक भर देत सत्य घटनांचे चित्रपटात घडवलेले दर्शन त्यांनी अधोरेखित केले.
इतिहासात हरवून गेलेल्या अनाम वीरांच्या कहाण्या आणि जनसमुदायाला प्रेरित करण्याबाबत स्त्रियांकडे असलेल्या सामर्थ्याचे वर्णन जगासमोर आणण्याचे महत्त्व अपर्णा पुरोहित यांनी जोरकसपणे विशद केले. अपूर्व मेहता यांनी या ऐतिहासिक चित्रपटामध्ये 1940 च्या काळातील दक्षिण मुंबईचा परिसर सजीव करून प्रत्येक फ्रेममध्ये अस्सलपणा जपण्याची सुनिश्चिती करण्याच्या दिशेने केलेल्या विचारमंथनाबद्दल माहिती दिली.
या सत्राच्या शेवटी, चित्रपट निर्मात्यांनी सामूहिकपणे असे मत मांडले की ए वतन, मेरे वतन’ हा केवळ एक व्यावसायिक चित्रपट नसून अत्यंत भावपूर्ण, सर्जनशीलतेने घेतलेला निर्णय आहे. इतिहासाच्या गर्तेत हरवलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विस्मृतीत हरवलेल्या कहाण्या जगासमोर आणणाऱ्या या शक्तिशाली चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देण्याची विनंती देखील त्यांनी उपस्थितांना केली.
* * *
PIB Mumbai |G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978916)
Visitor Counter : 98