निती आयोग

भारत आणि ऑस्ट्रेलियातील चक्राकार अर्थव्यवस्थाविषयक स्टार्ट अप उद्योगांना उभारी देण्यासाठी एआयएम-नीती आयोग यांच्यातर्फे नवा प्रवेगक कार्यक्रम सुरु

Posted On: 21 NOV 2023 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2023

चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित तंत्रज्ञाने आणि उपायांच्या क्षेत्रात कार्य करणारे, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील स्टार्ट अप्स आणि लघु ते मध्यम आकाराचे उद्योग यांना या दोन्ही देशांतील संधींचा शोध घेण्यासाठी नवी द्वारे खुली व्हावीत या दृष्टीने तयार केलेल्या नव्या प्रवेगकाचा फायदा होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित स्टार्ट अप उद्योगांना पाठबळ देण्यासाठी नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाने आज आरआयएसई अर्थात जलद नवोन्मेष आणि स्टार्ट अप विस्तार नामक नव्या प्रवेगकाची सुरुवात केली.

ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था सीएसआयआरओ आणि भारत सरकारने नवोन्मेष तसेच उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेला महत्त्वाचा उपक्रम अटल नवोन्मेष अभियान (एआयएम) यांच्या संयुक्त विद्यमाने हा भारत ऑस्ट्रेलिया आरआयएसई प्रवेगक निर्माण करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय उच्चायुक्त मनप्रीत वोहरा म्हणाले, आंतरराष्टीय संबंधांच्या चैतन्यपूर्ण पटलावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी म्हणजे या दोन्ही देशांना एकत्र बांधून ठेवणारी आपली सामायिक मूल्ये, आर्थिक स्वारस्याच्या बाबी आणि भू-राजकीय उद्दिष्ट्ये यांची साक्षीदार आहे. आरआयएसई प्रवेगक केवळ दोन्ही देशांदरम्यान असलेले राजनैतिक बंध मजबूत करणार नसून, विविध क्षेत्रांमधील सहयोगी संबंधांसाठी देखील मार्ग प्रशस्त करेल.

नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाचे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव याप्रसंगी म्हणाले, आरआयएसई प्रवेगक हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार केलेला आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्याप्रती समर्पित असलेला बहु-वर्षीय द्विपक्षीय प्रवर्तक कार्यक्रम म्हणून काम करणार आहे.पर्यावरण आणि हवामानविषयक तंत्रज्ञानाच्या व्यापक संकल्पनेवर केंद्रित असलेला आरआयएसई हा उपक्रम स्टार्ट अप उद्योगांना जागतिक आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अभिनव उपाययोजना शोधण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देतो.

आभासी पद्धतीने चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टार्ट अप उद्योगांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तसेच या कार्यक्रमातून त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यानच्या प्रवासाच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या जातील. या उपक्रमात सहभागी होणारे स्टार्ट अप उद्योग 40 लाख रुपयांपर्यंतच्या बिगर-इक्विटी अनुदानासाठी देखील पात्र असतील.

आरआयएसई प्रवेगक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे अर्ज आता खुले झाले असून शनिवार 7 जानेवारी 2024 पर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येतील.

या उपक्रमाची अधिक माहिती तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा :  https://riseaccelerator.org/

R.Aghor/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978563) Visitor Counter : 67


Read this release in: English , Urdu , Hindi